भ्रष्ट यंत्रणेच्या प्रतिकात्मक प्रतिमेला पैसे खाऊ घातले; शिवसेनेचे सेनगावात आंदोलन
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सोमवारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर भ्रष्ट यंत्रणेच्या प्रतीकात्मक प्रतिमेला पैसे खाऊ घालून प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन केले. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुंडक वर पाय, अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींनी प्रशासनात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर भ्रष्ट यंत्रणेच्या प्रतिकात्मक प्रतिमेला पैसे खाऊ घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, सेनगाव तालुक्यातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या ५ वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे न करता केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. धनगरवाडी येथेच 5 वर्षांत तब्बल ८५ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र, यातील अनेक विहिरी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील सर्व रोहयो कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात ही योजना पारदर्शकपणे राबविण्यात यावी. यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments are closed.