कॅमरून ग्रीनला 25 कोटींचा जॅकपॉट, आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला ग्रीन; प्रशांत वीर, कार्तिक शर्मासाठी चेन्नईची 28.40 कोटींची उधळण
सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात काही खेळाडूंवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू कॅमरून ग्रीनला लिलावात चक्क 25.20 कोटींचा जॅकपॉट लागला. ‘आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू’ असा मान देताना ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने पाव अब्जापेक्षा अधिक रक्कम मोजली. तसेच हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंवरही छप्पर फाडके बोली लागल्या. उत्तर प्रदेशचा 20 वर्षीय प्रशांत वीर आणि राजस्थानचा 19 वर्षीय कार्तिक शर्मा या दोघांसाठीही चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजले. विशेष म्हणजे दोघांचीही मूळ किंमत 30 लाख रुपये होती, म्हणजेच त्यांना या लिलावात तब्बल 47 पट अधिक रक्कम मिळाली.
कॅमेरून ग्रीन आघाडीवर
आयपीएलच्या मिनी लिलावात महागडय़ा विदेशी खेळाडूवरच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने इतिहास रचत लिलाव गाजवला. लिलावाच्या पहिल्याच टप्प्यात कॅमेरून ग्रीनचे नाव पुकारताच बोलीला वेग आला. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ग्रीनसाठी चुरशीची स्पर्धा रंगली. बोली कोटींच्या घरात पोहोचताच उत्सुकता शिगेला पोहोचली आणि अखेर कोलकाताने तब्बल 25 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या खरेदीसह कॅमेरून ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला.
ग्रीन झाला मालामाल
अबूधाबी येथे असलेल्या या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) कॅमरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने मिचेल स्टार्कचा (24.75 कोटी) गतवर्षीचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलच्या इतिहासातील एकूण सर्वात महाग खेळाडू म्हणून ऋषभ पंतचे (27 कोटी) अव्वल स्थान मात्र अबाधित राहिले.
ग्रीनला प्रत्यक्षात मिळणार 18 कोटी
केकेआरने कॅमरन ग्रीनसाठी 25.20 कोटींची बोली लावली असली तरी त्याला प्रत्यक्षात 18 कोटी रुपयेच मिळणार आहेत. उर्वरित 7.20 कोटी रुपये बीसीसीआयच्या वेल्फेअर फंडात जमा होतील. बीसीसीआयने विदेशी खेळाडूंसाठी मिनी ऑक्शनमध्ये 18 कोटींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
इतर महत्त्वाचे लिलाव
- जम्मू-कश्मीरचा आकिब नबी डार दिल्ली कॅपिटल्सकडून 8.40 कोटींना खरेदी
- रवी बिष्णोईला राजस्थान रॉयल्सने 7.20 कोटींना घेतले.
- व्यंकटेश अय्यरला आरसीबीने 7 कोटींना खरेदी केले. (2024 च्या आयपीएल लिलावात अय्यर हा 23.75 कोटींना विकला गेला होता)
- वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर गुजरात टायटन्सकडून 7 कोटींना खरेदी.
- बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान केकेआरकडून 9.20 कोटींना
पृथ्वी शॉ, सरफराजला किंमत
गेल्या लिलावात पृथ्वी शॉ आणि सरफराज खान या हिंदुस्थानच्या कसोटीपटूंना कुणी भावच दिला नव्हता. आजही त्यांच्यावर तीच परिस्थिती ओढावते की काय असे वातावरण होते, मात्र या दोघांनाही त्यांच्या मूळ किमतीत म्हणजे 75 लाखांत खरेदी करण्यात आले. दिल्लीने पृथ्वी शॉला पुन्हा एकदा संघात घेतले तर सरफराज खानला चेन्नईने विकत घेतले.
आयपीएल इतिहासातील महागडे परदेशी खेळाडू
- कॅमेरून ग्रीन – 25.20 कोटी (कोलकाता-2026)
- मिचेल स्टार्क – 24.75 कोटी (कोलकाता-2024)
- पॅट कमिन्स – 20.50 कोटी (हैदराबाद – 2024)
- सॅम करण – 18.50 कोटी (पंजाब- 2023)
- कॅमरून ग्रीन – 17.50 कोटी (मुंबई- 2023)
- ख्रिस मॉरिस – 16.25 कोटी (राजस्थान 2021)
- बेन स्टोक्स – 16.25 कोटी (चेन्नई 2023)
- निकोलस पूरन – 16 कोटी (लखनऊ 2023)
अननुभवी खेळाडूंचे भाग्य फळफळले
अनकॅप्ड म्हणजेच देशांतर्गत राज्य संघातही स्थान मिळवू न शकलेल्या अननुभवी खेळाडूंसाठी आयपीएलचा मिनी लिलाव भाग्य फुलवणारा ठरला आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या विशीतल्या खेळाडूंना 14.20 कोटींची भन्नाट किंमत लाभली. त्यांची मूळ किंमत अवघी 30 लाख रुपये होते. तसेच मंगेश यादवसाठी आरसीबीने 5.20 कोटी इतकी मोठी किंमत मोजली. अक्षत रघुवंशी, सलील अरोरा, मुकुल चौधरी या नव्या खेळाडूंवरही कोटींची बोली लागल्याने आयपीएलच्या लिलावाने अनेक छोटय़ा खेळाडूंना दिवसाढवळय़ा कोटय़धीश केले आहे.
भाव मिळालाच नाही…
आयपीएलच्या मिनी लिलावात काही अनकॅप्ड खेळाडूंचे भाग्य जोरावर दिसले, मात्र काही नामवंत खेळाडूंना लिलावात भावच मिळाला नाही. यात झाय रिचर्ड्सन, अल्जारी जोसेफ, दासुन शनाका, डॅरिल मिचेल, मायकल ब्रेसवेल, सीन ऍबॉट, झेक फ्रेझर, मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, जॅमी स्मिथ, गस अटकिंग्सन, मुझीबूर रहमान, रहमानुल्लाह गुरबाज, विआयन मुल्डर, डेव्हन कॉन्वे, जॉनी बेअरस्टॉ आणि जिराल्ड कोत्झी या अनुभवी खेळाडूंना भावच लाभला नाही.
Comments are closed.