Monsoon 2025 News : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?

गेल्या काही दिवसांपासून देशातील लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. यातच आता पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाने मंगळवारी सांगितले की, मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात, निकोबार बेटांवर आणि अंदमान समुद्राच्या उत्तरेकडील भागात पुढे सरकत आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच देशात दाखल होणार, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने सांगितलं आहे की, गेल्या दोन दिवसांत निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. या काळात दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर वाऱ्याचा वेग 20 नॉट्सपेक्षा जास्त झाला आहे आणि काही भागात तो 4.5 नॉट्सपर्यंत वाढला आहे.

महाराष्ट्रात कधी बरसणार?

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 1 जून राजी हिंदुस्थानात दाखल होईल. त्यानंतर 5 ते 6 जून रोजी मान्सून कोकणामार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Comments are closed.