सुखद धक्का! मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात, बुधवारपर्यंत मुंबईत येणार

नैऋत्य मान्सूनने रविवारी नवीन विक्रम नोंदवत महाराष्ट्रात 12 दिवस आधीच ‘एण्ट्री’ केली. सर्वसाधारणपणे 7 जूनला दाखल होणाऱया मान्सूनने महाराष्ट्राला मोठे सरप्राईज दिले आणि केरळातून दुसऱयाच दिवशी महाराष्ट्र मुक्कामी आला. प्रचंड वेगाने सक्रिय झालेला मान्सून पुढच्या तीन दिवसांतच राजधानी मुंबईबरोबरच राज्याच्या इतर काही भागांत दाखल होईल, असे शुभ संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 35 वर्षांत पहिल्यांदाच मान्सूनने मे महिन्यात महाराष्ट्रात एण्ट्री मिळवली आहे.

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी जोरदार तडाखा दिला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक भागांत वादळी वारे, अतिवृष्टी होऊन नुकसान झाले. याचदरम्यान मान्सूनला अनुकूल परिस्थिती तयार होती. त्याअनुषंगाने हवामान खात्याने मान्सूनच्या ‘अर्ली इनकमिंग’चे संकेत दिले होते. हवामान खात्याचा तो अंदाज खरा ठरवत मान्सून प्रचंड वेगाने सक्रिय झाला आणि यापूर्वीचे विक्रम मोडीत काढत महाराष्ट्र चक्क 12 दिवस आधी प्रवेश मिळवला. सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड तालुक्यात मान्सूनचे शानदार आगमन झाले. मान्सूनने केरळ, मिझोराम व मणिपूरचा काही भाग, नागालँड, कर्नाटकचा बहुतांश भाग, संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्रात तळकोकणात हजेरी लावली असून पुढील तीन दिवसांत तो मुंबई व राज्याच्या उर्वरित भागांत दाखल होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी भुते यांनी दिली. मान्सूनच्या सक्रियतेचा वेग पाहता पाच दिवसांतच तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अनुमान हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

हवामान खात्याचा अनुमान

मान्सून तीव्र वेगाने सक्रिय झाला आहे. पुढील तीन दिवसांत तो मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत, मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत, बंगळुरूसह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामीळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तसेच ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे सरकेल. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पूर्णपणे अनुकूल परिस्थिती आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

  • मान्सून शनिवारी केरळमध्ये दाखल झाला होता. त्याच्या दुसऱयाच दिवशी तो महाराष्ट्रात दाखल झाला. केरळपाठोपाठ दुसऱयाच दिवशी महाराष्ट्रात मान्सून येण्याची ही 2009 नंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1990 मध्ये 20 मे रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले होते.

राज्यातील मान्सूनची एण्ट्री

वर्षाची तारीख

2019 20 जून
2020 11 जून
2021 5 जून
2023 11 जून
2024 6 जून

कोकणात पुढचे पाच दिवस मुसळधार

देवगडमध्ये दाखल झालेला मान्सून पुढचे पाच दिवस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यात मुसळधार हजेरी लावेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनची कृपा होणार असल्याने राज्यातील बळीराजा सुखावला आहे. हवामान खात्याने याआधीच यंदा पाऊस समाधानकारक पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

बारामती, दौंड आणि इंदापुरात ढगफुटीसारखा पाऊस

पुण्यातील इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यांत पावसाने थैमान घातले आहे. ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांचा संपर्क तुटला असून पुणे-सोलापूर मार्गावर पाटस येथे इनोव्हा कार पुरात वाहून गेली. पूरस्थितीमुळे ‘एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले आहे.

Comments are closed.