Monsoon Session 2026 : अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी टास्क फोर्स

राज्यातील बेकायदा वाळू उत्खनन रोखण्यासाठी तसेच वाळू माफियांशी संगनमत करून तस्करांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्या वर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. गडचिरोली येथे वैध गौणखनिज तस्करी करणाऱ्या नी नायब तहसीलदारावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी काँग्रेसच्या रामदास मसराम यांनी आज प्रश्न विचारला होता.

विद्यार्थिनींसाठी सहा महिन्यांत स्वच्छतागृहे

शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक असून यासाठी नव्याने सर्वेक्षण करून पुढील चार ते सहा महिन्यांत आवश्यक बांधकामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

प्रस्तावित मरीन, वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प रद्द करा

दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट ते राजभवन यादरम्यान मरीन आणि वॉटर ट्रान्सपोर्ट टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शासनाने सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. सुनावणीत स्थानिक मच्छीमारांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांचा विरोध पाहता सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी विशेष उल्लेख सूचना आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत मांडली.

चिंचवडमध्ये उभी राहणार ‘अजितसृष्टी’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. तसेच नियोजित जागेवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्लॉटिंग तत्काळ थांबवावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.

लोहगड हत्याप्रकरणी एसआयटी चौकशी

पुणे येथील लोहगडावर सिया गोयल ही तरुणी आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतन अगरवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली. त्याप्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, असे निर्देश आज राज्य शासनाने विधानसभेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत हे प्रकरण गुंतागुंतीचे असून यात आणखीही काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

लोकलमधील हत्याप्रकरणी निवेदन करण्याचे निर्देश

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून एका तरुणाच्या झालेल्या निर्घृण हत्येचे पडसाद आज विधानसभेत उमटले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावर राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करावी आणि सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

Comments are closed.