भारतात जीडीपीपेक्षा जास्त सोने आहे.
सोने खरेदीच्या प्रचंड आकर्षणामुळे मागणीही प्रचंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय लोकांना सोने खरेदीचे आकर्षण प्रचंड आहे, ही बाब सर्वश्रुत आहे. भारताच्या दरवर्षीच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही (जीडीपी) अधिक किमतीचे सोने भारतीयांच्या घरात पडून आहे. या सोन्याचे मूल्य तब्बल 5 लाख कोटी डॉलर्स किंवा साडेचार कोटी कोटी रुपये आहे. तर देशाचे 2024-2025 या आर्थिक वर्षाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जवळपास पावणेचार कोटी कोटी रुपये इतके आहे.
भारतात गेल्या वर्षभरात सोन्याच्या दराने कळस गाठला आहे. सध्या सोन्याचा भाव किमान 1 लाख 40 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही याच एक वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम भारतीय चनलनाच्या हिशेबात 1 लाख 30 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. भारतात सोने अत्यल्प प्रमाणात उत्पादित होते. प्रत्येक वर्षी भारतात जितके सोने खपते, त्याच्यापैकी 95 टक्के सोने भारताला आयात करावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढला, की भारतातही सोने महाग होते. ही आयात केली जाणारी वस्तू असल्याने भारतात सोन्याच्या दरांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठीही अशक्य बाब असते.
भारतीय घरांमध्ये सोने किती…
सध्या भारतीयांच्या घरांमध्ये किमान 34 हजार 600 टन सोने पडून आहे. सध्याच्या सोन्याच्या दराशी तुलना करता या सोन्याची किंमत 4.50 कोटी कोटी रुपये आहे. भारतावर असणाऱ्या परकीय कर्जाच्या जवळपास चौपट ही किंमत आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सारे जण शक्य होईल तितके सोने खरेदी करुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. तथापि, देशाची आवश्यकता पूर्ण करता येईल, इतके सोने भारतात निर्माण होत नाही. परिणामी, त्याच्या आयातीवरच देशाला अवलंबून रहावे लागते.
प्रतिमाणशी किती सोने…
भारताची लोकसंख्या साधारणत: 145 कोटी इतकी आहे. याचा अर्थ असा की भारतात प्रतिमाणशी सरासरी साधारणत: अडीच तोळे सोने आहे. अर्थातच, श्रीमंतांकडे असणाऱ्या सोन्याचे प्रमाण जास्त आहे. पण भारतात गरीबही जमेल तेव्हडी सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे त्यांच्याकडेही एकत्रितरित्या सोने मोठ्या प्रमाणात असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होते. ही माहिती ‘इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंग्ज’ या संस्थेचे संचालक डॉ. मनोरंजन शर्मा यांनी दिली आहे.
विकले जात नाही सोने…
अडीअडचणीच्या प्रसंगी आर्थिक आधार म्हणून भारतात सोने खरेदी केले जाते. तथापि, प्रत्यक्षात अशी अडचण उद्भवते, तेव्हा सर्वसामान्य भारतीय माणूस सोने विकतच नाही. कारण, ते विकल्यास आपली आर्थिक सुरक्षा कायमची नाहीशी होईल अशी धास्ती त्याला वाटते. याचाच अर्थ असा की सोने हा त्याचा केवळ भावनिक आधार असतो. प्रत्यक्ष व्यवहारात तो आपल्याजवळील सोने क्वचितच विक्रीला काढतो. हे सोने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, असे वर्षानुवर्षे हस्तांतरित होत राहते. त्यामुळे व्यवहारी विचार करता ही ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ ठरते.
आभूषणांच्या स्वरुपात…
भारतीयांकडे असलेले सोने बव्हंशी आभूषणे किंवा दागिन्यांच्या स्वरुपात असते. शुद्ध सोन्याची नाणी किंवा सोन्याची बिस्कीटे यांच्या स्वरुपात सोने श्रीमंत लोक किंवा सोन्याची आभूषणे उत्पादित करणारे लोक विकत घेतात. दागिने किंवा आभूषणे सहसा विकली जात नाहीत. ती मोडून नवी आभूषणे केली जातात.
बँकाही करतात सोन्याचा साठा
भारतात केवळ माणसेच नव्हे, तर बँकाही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2024 मध्ये 75 टन सोन्याची खरेदी करून आपला सोन्याचा साठा वाढविला आहे. भारताचा सरकारी सोन्याचा साठा 880 टन इतका आहे. चीनकडूनही सरकारी पातळीवर सोन्याची मोठी खरेदी केली जाते. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन येथील सरकारी किंवा मध्यवर्ती बँकाही सोन्यची खरेदी करतात. त्यामुळे सोन्याची मागणी प्रचंड असते. म्हणून त्याचा दरही प्रचंड असतो.
वर्षभरात सोने इतके का महागले…
एका वर्षात सोन्याचे दर इतके का वाढले हा लोकांना पडलेला प्रश्न आहे. काही लोक यासाठी सरकारला किंवा देशाच्या नेत्याला जबाबदार धरतात. पण ते चुकीचे आहे. कारण, सध्या जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या आर्थिक अस्थिरतेची आपल्याला झळ पोहचू नये, यासाठी सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. परिणामी, त्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने दरही वाढले आहेत. या दरवाढीसाठी कोणतेही सरकार किंवा नेते उत्तरदायी नसतात, ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने सोने अनुदानित किमतीत, म्हणजेच मूळ किमतीपेक्षा स्वस्तात विकायचे ठरविले, तर सरकारवर फार मोठा आर्थिक ताण विनाकारण पडणार आहे, कारण सोने ही काही अन्न किंवा ऊर्जा यांच्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे सोने दरवाढ गेल्या 12 महिन्यांमध्ये इतकी का झाली, याची खरी कारणे प्रत्येकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
Comments are closed.