100 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

छत्तीसगडमधील सर्वात मोठी शरणागती मोहीम : प्रत्येकी 25 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन कमांडरचा समावेश

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिह्यांमधून बडे नक्षलवादी आत्मसमर्पण करताना दिसत आहेत. कांकेर जिह्यातील कोयलीबेडा पोलीस स्टेशन हद्दीतील कामटेडा बीएसएफ कॅम्पमध्ये बुधवारी नक्षल संघटनेच्या सर्वात सक्रिय कंपनी क्रमांक 5 मधील 100 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये उत्तर बस्तरचा कुख्यात नक्षलवादी नेता राजू सलाम आणि राजमान या दोन बड्या कमांडरचा समावेश आहे. या दोघांवर प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. या सामूहिक आत्मसमर्पणात पाच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलवादी नेत्या गीता उर्फ कमली सलाम यांचाही समावेश आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी इतिहासातील ही सर्वात मोठी आत्मसमर्पण मोहीम आहे.

कांकेर जिल्ह्यातील पंखजूर पोलीस स्टेशन परिसरात सक्रिय असलेल्या अनेक नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले. या माध्यमातून नक्षलवादी संघटनेचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कंपनी क्रमांक 5’ ने आता हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे. सुरक्षा दलांसाठी दीर्घकाळ आव्हान असलेल्या कंपनी क्रमांक 5 चे आत्मसमर्पण नक्षलवादी आघाडीवर निर्णायक ठरू शकते. तीन बसेसमध्ये भरलेले 100 हून अधिक नक्षलवादी बुधवारी कामतेडा बीएसएफ कॅम्पमध्ये पोहोचले. याप्रसंगी त्यांनी शस्त्रास्त्रांसह पोलीस अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेले 30 नक्षलवादी आहेत. तसेच इतर सक्रिय सदस्य होते. या सर्वांना पूर्व-निर्धारित गुप्त आत्मसमर्पण मार्गाने गेंडाबेडा गावात पायी आणण्यात आल्यानंतर बीएसएफ बसेसमधून छावणीत नेण्यात आले.

या आत्मसमर्पणामुळे उत्तर बस्तरमधील अनेक भाग ‘नक्षलमुक्त’ घोषित होऊ शकतो. सुरक्षा संस्थांनी हे एक सकारात्मक संकेत म्हणून वर्णन केले आहे. पोलिसांनी अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नसली तरी, आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या 100 हून अधिक असल्याचा अंदाज आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिस महानिरीक्षक, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि बीएसएफ पथकाने मोठी भूमिका बजावली. सुरुवातीला 16 ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पण होणार असल्याचे नियोजित करण्यात आले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते एक दिवस आधीच करण्यात आले. अधिकाऱ्यांनी या घटनेचे श्रेय सरकारी योजना आणि विकास कामांमुळे प्रभावित होऊन मुख्य प्रवाहात परतणाऱ्या लोकांना दिले. सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारी धोरणांतर्गत रोख प्रोत्साहन, गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

छत्तीसगड सरकारचे ‘शरणागती पुनर्वसन धोरण’, ‘नियाद नेल्ला नर योजना’ आणि अंतर्गत भागात सुरक्षा छावण्यांची वाढती उपस्थिती ही आत्मसमर्पणामागील कारणे असल्याचे मानले जाते. या आत्मसमर्पणात सीआरपीएफ (2, 74, 131, 151, 216 आणि 217 बटालियन) आणि कोब्रा 203 बटालियननेही महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेपूर्वी मंगळवारी महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यामध्ये सोनू नावाच्या बड्या नक्षलवाद्यासह 60 नक्षलवाद्यांचा समावेश होता.

 

Comments are closed.