100 हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत

अलर्ट मोडमध्ये सुरक्षा यंत्रणा : घुसखोरी रोखण्यासाठी रणनीतित बदल

मंडळ संस्था/श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीवरून सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढल्या आहेत. नियंत्रण रेषेच्या पार जवळपास 69 लाँचपॅड सव्रीय असून तेथे 100 हून अधिक दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. अलिकडच्या महिन्यांमध्ये लाँचपॅडवरील हालचाली वाढल्या असल्याची माहिती बीएसएफच्या काश्मीर फ्रंटियरचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी दिली आहे.

दहशतवादी आता घुसखोरीसाठी नव्या मार्गांचा वापर करत आहेत. परंतु भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या नव्या मार्गांना हुडकून काढत घुसखोरीला चाप लावला आहे. भारतीय यंत्रणांनी घुसखोरीविरोधी ग्रिडला आणखी मजबूत केले आहे.

हिवाळा नजीक येताच नियंत्रण रेषेवर हिमवृष्टी सुरू होण्यापूर्वी घुसखेरीचे प्रयत्न वाढत असतात. नियंत्रण रेषेच्या पलिकडे सातत्याने हालचाली दिसून येत ड्रोन टेहळणीत वाढ झाली आहे. पर्वतांवर हिमवृष्टी होण्यापूर्वी घुसखोरीचे प्रयत्न होऊ शकतात. चालू वर्षात आतापर्यंत  घुसखोरीचे चार प्रयत्न झाले असून यात 8 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. हा भाग अत्यंत प्रतिकूल असून कडाक्याची थंडी, ओबडधोबड पर्वत, खराब हवामान, बॅट हल्ल्यांचा धोका, स्नायपिंग, शस्त्रसंधी उल्लंघन आणि आत्मघाती हल्ल्यांमुळे आव्हान वाढत असल्याचे यादव यांनी सांगितले.

पाकिस्तानी बॅटचा धोका

बॅट म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या हल्ल्याचा धोका असतो. यात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी सामील सामील असतात. हे दहशतवादी रात्री घुसखोरी घत घात लावून हल्ला करतात. हिवाळ्यात जोखिमयुक्त मार्गांचा वापर वाढतो, कारण अशा मार्गांवर सामान्य स्वरुपात गस्त कमी होते.  आगामी आठवड्यांमध्ये घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएफने स्वत:च्या क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे. प्रभावी सेंसर, ड्रोन, बहुस्तरीय देखरेख आणि विशेष प्रशिक्षणावर वेगाने काम होत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर बदलली रणनीति

मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरने भारताच्या तयारीला नवा आकार दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण तळ आणि लॉजिस्टिक हबवर सातत्याने नजर ठेवली जातेय. अनेक दहशतवादी तळ भारतीय कारवाईच्या भीतीने अन्य भागांमध्ये हलविण्यात आले आहेत असे बीएसफ अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय गुप्तचर यंत्रणांनुसार पाकिस्तानचे ‘डीप स्टेट’ लष्कर-ए-तोयबाला आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व देत आहे, तर जैश-ए-मोहम्मद कमकुवत स्थिती पोहोचली आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहर बांगलादेशात सक्रीय दहशतवादी नेटवर्क्सनाही सूचन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Comments are closed.