माथेरानमध्ये एक हजार बंधारे; जमिनीची धूप थांबली, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत

निसर्गरम्य माथेरानची लाल माती पर्यटकांना हवीहवीशी वाटते. या मातीच्या पायवाटेवरून चालण्याचा आनंद काही वेगळाच. पण दरवर्षी पावसाळ्यात जमिनीची धूप होत असल्याने माती नष्ट होऊन तेथील भाग निसरडा होत असतो. मात्र यावर्षी प्रशासनाने विशेष काळजी घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बंधारे बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे जमिनीची धूप रोखली असून पर्यावरणाचा समतोलदेखील राखला गेला आहे.

माथेरानमधील बंधारे काही वर्षांनंतर निकामी होतात. त्याची पुन्हा दुरुस्ती करावी लागते. नगर परिषदेने यंदा एक हजार बंधारे बांधण्याचा ठेका दिला आहे. त्यातील बहुतांश बंधारे बांधून पूर्ण झाले असून अजूनही काम सुरू आहे. पिसरनाथ मंदिर, इको पॉइंट, हनीमून पॉइंट यांसह विविध ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगण्यात येते.

पेव्हर ब्लॉकचाही फायदा
दस्तुरी नाक्यापासून ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत पेव्हर ब्लॉकचे रस्ते केल्यामुळे पावसाळी मातीची धूप आणि उन्हाळ्यात सुक्या मातीचा उडणारा धुरळा याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. दरवर्षी माथेरानमध्ये दोन हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. यापुढे हे प्रमाण वाढत गेले तर मातीचे रस्ते शाबूत राहतील की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. जुने ब्रिटिशकालीन रस्तेदेखील इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवले तर रस्त्यांची धूप थांबू शकते, असे माथेरानवासीयांचे म्हणणे आहे

Comments are closed.