स्टीव्ह स्मिथची ब्रॅडमन-पाँटिंगच्या धडाकेबाज लिस्टमध्ये एंट्री, अशी कामगिरी करणारा केवळ चौथाच फलंदाज

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केली. आघाडीच्या फळीतील दमदार कामगिरीमुळे प्रथम फलंदाजी करताना कांगारुंनी मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ नाबाद 68 आणि कमिन्स 8 धावांवर खेळत आहे. आपल्या या अर्धशतकी खेळीसह स्मिथनं महान डॉन ब्रॅडमनच्या विशेष यादीत स्थान मिळवलं.

स्टीव्ह स्मिथ ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल आणि रिकी पाँटिंग सारख्या दिगग्ज फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या सर्वांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कसोटीमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. या यादीत ग्रेग चॅपेल अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 17 कसोटीत 13 वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ब्रॅडमननं 11 कसोटीत 12 वेळा, रिकी पाँटिंगनं 15 कसोटीत 11 वेळा आणि स्टीव्ह स्मिथनं 12 कसोटीत 11 वेळा ही कामगिरी केली.

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात स्टीव्ह स्मिथनं 71 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज होण्याच्या जवळ आहे. त्याच्यापूर्वी पाँटिंग, ॲलन बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ यांनी ही कामगिरी केली आहे. पर्थ आणि ॲडलेडमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्मिथची कामगिरी चांगली नव्हती. मात्र गेल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर तो फॉर्ममध्ये परतला आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त कसोटी धावा

ग्रेग चॅपेल – 17 कसोटीत 13 वेळा
डॉन ब्रॅडमन – 11 कसोटीत 12 वेळा
रिकी पाँटिंग – 15 कसोटीत 11 वेळा
स्टीव्ह स्मिथ – 12 कसोटीत 10 वेळा

हेही वाचा –

कॉन्स्टासला धक्का मारल्यानंतरही विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी का लावली नाही? नियम जाणून घ्या
मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा या क्रमांकावर फलंदाजी करणार, अभिषेक नायरनं स्पष्ट केलं
19 वर्षाच्या पोरानं जे केलं, ते बुमराह कधीच विसरणार नाही! करिअरमध्ये असं प्रथमच घडलं

Comments are closed.