एकाच टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके! 2026 बनले खास, मात्र एक खंत

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या शतकानंतर आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शतकांची संख्या चारवर पोहोचली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एका आवृत्तीत एवढे शतके केली गेली. याआधी एकाही आवृत्तीत एवढे शतके झाली नव्हती. आता आपण कोणत्या आवृत्तीत किती शतके केली गेली, हे जाणून घेऊ.
हॅरीने मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात शतक केले आणि संघाच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. यामुळे पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य इंग्लंडने दोन विकेट्स शिल्लक राखत पार केले. हॅरीने लक्ष्याचा पाठलाग करताना ५० चेंडूत १०० धावा केल्या. यामुळे तो २०२६च्या टी२० विश्वचषकात शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
याआधीच्या पुरुष टी२० विश्वचषकांमधील एका आवृत्तीत इतके शतके झाली नव्हती. यंदाच्या विश्वचषकात हॅरीच्या आधी पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान, श्रीलंकेच्या पथुम निसांका आणि कॅनडाच्या युवराज समराने शतके केली आहे. टी२० विश्वचषकात कोणी शतके केली हे पाहू.
पुरुषांच्या टी२० विश्वचषकात पहिले शतक करण्याचा मान वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलला जातो. त्याने २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या टी२० विश्वचषकात एकही शतक झाले नाही (२००९). या स्पर्धेत भारताकडून पहिले शतक सुरेश रैनाने केले होते. त्याने २०१०मध्ये हे शतक केले त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूने शतक केले नाही.
तसेच टी२० विश्वचषक २०१०मध्ये श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेने शतक केले होते. २०१२मध्ये न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने शतक केले होते. त्याने बांग्लादेशविरुद्ध १२३ धावा केल्या होत्या. २०१४मध्ये इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने श्रीलंकेविरुद्ध आणि पाकिस्तानच्या अहमद शहजादने बांग्लादेशविरुद्ध शतके केली होती.
टी२० विश्वचषक २०१६मध्ये तमीम इक्बाल आणि गेलने शतके केली. त्यामुळे गेल हा टी२० विश्वचषकात दोन शतके करणारा एकमेव खेळाडू ठरला. २०२१मध्ये इंग्लंडच्या जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध १०१ धावा केल्या, २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसो आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने शतकी खेळी केल्या.
भारताने २०२४मध्ये विजेतेपद जिंकले, त्यात एकही शतक झाले नाही. तसेच २०२६च्या टी२० विश्वचषकात एकाही भारतीयाने शतक केले नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने यूएसएविरुद्ध नाबाद ८४ धावा केल्या. या विश्वचषकात त्या भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.
Comments are closed.