सचिनचा विक्रम धोक्यात; रोहित-कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचू शकतात नवा इतिहास
भारतीय क्रिकेट संघाचे दोन प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. दोघेही 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या मालिकेमध्ये त्यांच्याकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.
सध्या वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 1991 ते 2012 दरम्यान 71 वनडे सामन्यांमध्ये 9 शतकं झळकावली होती. आता हेच शतकांचं शिखर रोहित आणि विराट दोघांच्याही जवळ आलं असून, त्यांच्या फलंदाजीवर सर्वांचं लक्ष राहणार आहे.
हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 46 सामन्यांमध्ये 8 शतकं केली आहेत. जर त्याने आगामी मालिकेत दोन शतकं ठोकली, तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वाधिक शतकं करणारा भारतीय फलंदाज ठरेल.
दुसरीकडे, विराट कोहलीनेही ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 50 वनडे सामन्यांमध्ये 8 शतकं झळकावली आहेत. विराटलाही फक्त दोन शतकांची आवश्यकता असून, तो देखील या ऐतिहासिक यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अनुभव पाहता, हा विक्रम मोडण्याची शक्यता प्रबळ आहे.
याशिवाय, या यादीत वेस्ट इंडिजचे डेसमंड हेन्स (6 शतकं, 64 सामने) आणि दक्षिण आफ्रिकेचे फाफ डुप्लेसी (5 शतकं, 22 सामने) यांचा देखील समावेश आहे. मात्र रोहित आणि विराट दोघेही सध्या या शर्यतीत सर्वांत पुढे आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर, क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघेही जर त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी केली, तर भारतीय क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो.
Comments are closed.