INDvsNAM: टी20 वर्ल्डकपच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, ईशानने केली रोहितची बरोबरी

मागील महिन्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने धमाक्यात सुरूवात केली आहे. टी२० विश्वचषकासाठी बॅकअप म्हणून संघात घेतलेल्या ईशानने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्धही त्याचे वादळ आले आणि रोहित शर्माच्या टी२० विश्वचषकाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.
आक्रमक फलंदाजीचा सूर ईशानने न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेपासून सुरूच ठेवला आहे. नामिबियाविरुद्धचा सामना खेळल्या गेलेल्या अरुण जेटली स्टेडियमवरही त्याने सलामीला येताना उत्तम सुरूवात केली. त्याने केवळ २० चेंडूतच ५० धावा पूर्ण केल्या. या सामन्यात त्याने सहाव्या षटकात जेजे स्मिटच्या गोलंदाजीवर २८ धावा वसूल केल्या. यामधील पहिला चेंडू निर्धाव गेला, नंतर त्याने सलग चार षटकार आणि एक चौकार मारला. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी२०मधील आठवे अर्धशतक ठरले.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एकाच षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता ईशानचा समावेश झाला आहे. या यादीत त्याने रोहितची बरोबरी केली. रोहितने २०२४मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या एका षटकात २८ धावा केल्या होत्या. आता तो या प्रकारातून भारतीय संघातून निवृत्त झाला आहे.
तसेच टी२० विश्वचषकात एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू युवराज सिंग आहे. त्याने २००७मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार मारत ३६ धावा वसूल केल्या होत्या. तेव्हा त्याने केवळ १२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावसंख्या उभारली होती. त्यामध्ये ईशानने तिलकसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. तसेच हार्दिक पांड्याने शिवम दुबेसह पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. यावेळी हार्दिकने ५२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने दोन विकेट्सही घेतल्या. वरुण चक्रवर्तीने ३, अक्षर पटेलने २ आणि अर्शदिप सिंग, शिवम, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.
नामिबियाकडून सर्वाधिक धावा लौरेन स्टीनकॅम्पने केल्या. त्याने २० चेंडूत २९ धावा केल्या. बाकी फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले. भारताने हा सामना ९३ धावांनी जिंकला. हार्दीक अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर ठरला.
टी२० विश्वचषकाच्या एका षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
३६ – युवराज सिंग वि. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), २००७
३० – जोस बटलर वि. हरमीत सिंग (यूएसए), २०२४
३०- फिल सॉल्ट वि. रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडिज), २०२४
२९ – जेहान मुबारक वि. ओन्यांगो (केनिया), २००७
29 – एबी डिव्हिलियर्स विरुद्ध राशिद खान (अफगाणिस्तान), 2016
28 – रोहित शर्मा विरुद्ध मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), 2024
– इशान किशन वि. जेजे स्मित (नामिबिया), 2026
Comments are closed.