MPL 2025 चे टॉप 5 सिक्सर किंग, फायनलमध्येही रंगली फायनल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा रविवारी समारोप झाला. गहूंजे येथे झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 6 गडी राखून रायगडला पराभूत केले. अंतिम सामन्यात षटकार-चौकारांची चांगलीच बरसात झाली. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक षटकार कोण मारणार, याची वेगळीच फायनल या अंतिम सामन्यात दिसली. आपण जाणून घेऊया की, एमपीएल 2025 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे पाच फलंदाज कोण आहेत.

सिद्धेश वीर- एमपीएल 2025 हा संपूर्ण हंगाम फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केलेल्या रायगड रॉयल्सच्या सिद्धेश वीर याच्यासाठी ओळखला जाईल. सिद्धेशने फलंदाजीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्याने स्पर्धेत 11 सामने खेळताना सर्वाधिक 450 धावा जमा केल्या. स्पर्धेतील सर्वोत्तम सरासरी देखील त्याचीच राहीली. अंतिम सामन्यातही 99 धावा करणाऱ्या सिद्धेश याने स्पर्धेत सर्वाधिक 18 षटकार मारले. त्याने खेळलेल्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत हा मान आपल्याकडे ठेवला.

अर्शिन कुलकर्णी- रायगडसाठी सिद्धेश याने अंतिम सामन्यात प्रयत्नांची पराकाष्टा केली. तर, ईगल नाशिक टायटन्सला विजेते बनवण्यात अर्शिन कुलकर्णी याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने अंतिम सामन्यात 77 धावा केल्या. अर्शिन याने देखील सिद्धेश याच्याप्रमाणेच स्पर्धेत 18 षटकार मारले. त्याला या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी होती. मात्र, षटकार मारण्याच्या प्रयत्नातच तो अंतिम सामन्यात बाद झाला होता. आपल्या याच खेळी दरम्यान अर्शिन याने एमपीएल इतिहासात 50 षटकार पूर्ण केले.

मंदार भंडारी- सिद्धेश वीर व अर्शिन कुलकर्णी यांच्या पाठोपाठ ईगल नाशिक टायटन्सचा सलामीवीर मंदार भंडारी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मंदार याने पहिल्या सामन्यातच 6 षटकार ठोकले होते. तर, अंतिम सामन्यात देखील त्याच्या बॅटमधून दोन षटकार आले. त्याने हंगामात 10 सामने खेळताना 16 गगनचुंबी षटकार मारले. अंतिम सामन्यातील त्याची आक्रमक सुरुवात ईगल नाशिक टायटन्स संघासाठी फायदेशीर ठरली.

साहिल परीख- अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी यांच्यानंतर ईगल नाशिक टायटन्सचा युवा फलंदाज साहिल पारख हा देखील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहिला. त्याने केवळ आठ सामने खेळताना 14 उत्तुंग षटकार ठोकले. भारताच्या अंडर 19 संघासाठी खेळलेल्या साहिल याने ईगल नाशिक टायटन्स संघाच्या विजयात सातत्याने योगदान दिले.

यश नहर आणि नीरज जोशी- पुणेरी बाप्पा संघाचा सलामीवीर यश नाहर हा स्पर्धेच्या सुरुवातीला चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. त्याने स्पर्धेत नऊ सामने खेळताना 13 षटकार मारले होते. रायगड रॉयल्ससाठी खेळणारा 19 वर्षाचा डावखुरा फलंदाज नीरज जोशी याने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. त्याने फक्त 8 सामने खेळत 13 वेळा चेंडू सीमापार भिरकावला.

Comments are closed.