आईचं निधन आणि वडिलांचं दुसरं लग्न; 18 वर्षांच्या काकाने सावरलं अनिकेत वर्माचं आयुष्य!

आयपीएलमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळते आणि हे खेळाडू आपल्या मेहनतीच्या, कौशल्याच्या बळावर आपलं नाव कमावतात. सध्या सनरायझर्स हैदराबादमधील अनिकेत वर्मा याने यंदाच्या सीझनमधील पहिल्याच सामन्यात आपल्या फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने आरसीबीविरूद्ध पहिल्याच सामन्यात १८ चेंडूत ४३ धावा करत संघाला २०० धावांचा पल्ला पार करून दिला. पण त्याची आयपीएलपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि काकांनी त्याचा सांभाळ करत त्याला इथपर्यंत आणण्यात मोलाची मदत केली.

अनिकेतच्या यशात त्याच्या काकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लहान वयातच त्याने आपल्या आईला गमावलं आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केलं. अनिकेतने क्रिकेटपटू व्हावं असं त्याच्या काकांनी पाहिलेले स्वप्न त्याने सत्यात उतरवलं आहे.

अनिकेत वर्माच्या चार उत्तुंग षटकारांनी त्याला रातोरात इंटरनेट स्टार बनवलं. अनिकेतच्या या खेळीदरम्यान इयान बिशप यांनी त्याचा आतापर्यंतचा क्रिकेट प्रवास सांगितला आणि त्याची ही अंगावर काटा आणणारी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आयपीएलच्या झगमगाटापर्यंतचा अनिकेतचा प्रवास हा धैर्य आणि दृढनिश्चयाची गाथा आहे.

अनिकेतने फक्त ३ वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. अनिकेतचा सांभाळ त्याच्या काकांनी केला. आर्थिक अडचणी आणि क्रीडा सुविधांचा अभाव असूनही, अनिकेत भारतीय क्रिकेटचा नवा ‘फिनिशर’ म्हणून उदयास आला आहे. अनिकेतच्या आईच्या मृत्यूनंतर काका, अमित वर्मा, यांनी त्याची जबाबदारी घेतली. झाशीसारख्या एका लहान गावापासून ते आयपीएल स्टार बनण्यापर्यंतचा हा प्रवास अडचणींनी भरलेला होता. वयाच्या १८ व्या वर्षी, भावाच्या दुसऱ्या लग्नानंतर, त्याच्या काकांनी अनिकेतला आपल्यासोबत भोपाळला नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लहान वयातच काम शोधलं आणि त्याला क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्न पाहिलं.

भोपाळमधील प्रशिक्षक नंदजीत यांनी अनिकेतच्या काकांच्या स्वप्नाला पाठिंबा दिला. शेजारच्या रेल्वे अकादमीमध्ये त्याने खेळायला सुरूवात केली. लहानपणी, अनिकेत दिवसातील दहा तास मैदानावर क्रिकेट खेळायचा. काही महिन्यांनंतर तिथल्या कोचने सांगितलं, जर क्रिकेटमध्ये भविष्य घडवायचं असेल तर अंकुर क्रिकेट अकॅडमीमध्ये जे कोच आहेत तिथे घेऊन जा. काका तेव्हा गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करायचे, फक्त ३ ते साडेतीन हजार त्यांना सॅलरी होती. त्यामुळे मोठ्या अकॅडमीची फी कोण देणार. पण अनिकेतमधील चमक पाहून तिथल्या कोचने एकही पैसा घेतला नाही, शिवाय क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूही त्याला पुरवल्या.

त्यानंतर भोपाळमधील एका लीगमध्ये त्याची निवड करण्यात आली. भोपाळमधील या लीगमध्ये त्याने ६ सामन्यांमध्ये १९५ च्या स्ट्राईक रेटने २७३ धावा केल्या. ज्यामध्ये १२३ धावांची त्याने सर्वात मोठी खेळी केली होती. त्याच्या एका वादळी शतकानंतर ५ फ्रँचायझीन त्याला ट्रायल्ससाठी कॉल केले आणि २०२५ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने अनिकेत वर्माला ३० लाखांच्या बेस प्राईजला निवडलं आणि इथूनच त्याचा आयपीएलचा प्रवास सुरू झाला.

Comments are closed.