जन्मानंतर शोक, मृत्यूनंतरचा आनंद
राजस्थान राज्यात ‘सतिया’ नामक एक जमात आहे. या जमातीत एक विचित्र आणि जगावेगळी परंपरा आहे. कोणत्याही अपत्याचा जन्म झाला, तर त्याचे कुटुंबिय आणि त्या कुटुंबाचे हितचिंतक आनंदोत्सव साजरा करतात. मिठाई वाटली जाते. नव्या अर्भकाचे अतिशय आनंदाने स्वागत केले जाते. मात्र, घरात कोणाचा मृत्यू झाल्यास याच्या उलट वातावरण असते. मृत्यूवर दु:ख व्यक्त केले जाते. तथापि, या जमातीत अपत्याच्या जन्मानंतर शोक आणि दु:ख व्यक्त केले जाते. तर कोणाचा मृत्यू झाल्यास आनंद साजरा केला जातो. ढोल, नगारे आणि इतर पारंपरिक वाद्ये वाजविली जातात. अशी पूर्ण उलटी प्रथा असणारी ही, केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील एकमेव जमात असावी, असे मानले जाते.
अनेक समाजअभ्यासकांनी या जमातीतील या विचित्र प्रथेचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही जमात अत्यंत लहान आहे. तिची लोकसंख्या अगदीच कमी आहे. पण जमातीतील प्रत्येक परिवारात ही प्रथा कसोशीने पाळली जाते. अभ्यासकांनी संशोधन केले असता, त्यांना असे समजले आहे, की या प्रथेचे कारण एक ठाम विश्वास हे आहे. या जमातीचा असा विश्वास आहे, की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या आत्मा मुक्त होतो. तो मानवी देहाच्या यातना आणि दु:खे यांच्या पलिकडे जातो. त्यामुळे मृत्यू हा खरेतर आनंदाचा प्रसंग असतो. या जमातीतील लोक हा आत्मामुक्तीचा प्रसंग मानतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. जन्माची स्थिती याच्या उलट असते. जेव्हा एखादा जीव जन्माला येतो, तेव्हा तो पृथ्वीवर त्याची पापे भोगण्यासाठी आलेला असतो, अशी या जमातीची समजूत आहे. त्यामुळे अर्भकाच्या जन्माच्या वेळी दु:ख मानण्याची आणि शोक करण्याची परंपरा आहे. हा समुदाय अत्यंत लहान लोकसंख्येचा असल्याने त्याची ही प्रथा आजवर इतरांना फारशी परिचित नव्हती. पण आता ती चर्चेचा विषय बनली आहे. या समुदायाचा त्यांच्या या समजुतींवर गाढ विश्वास असल्याने तो ही प्रथा बंद करण्याचा विचार करत नाही. तसेच, ही प्रथा विशिष्ट समजुतीवर आधारित असून ती घातक किंवा अघोरी प्रथा नाही. त्यामुळे ती पाळली गेली तरी काही हानी होत नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पण ही प्रथा विचित्र आहे ही बाब मात्र खरी आहे.
Comments are closed.