दिल्ली ते जम्मू पर्यंतची हालचाल वेगवान आहे
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची पंतप्रधानांशी चर्चा : काश्मीरमध्ये ठिकठिकाणी शोधमोहीम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढत चालला असतानाच दिल्लीपासून काश्मीरपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर हालचाली गतिमान झालेल्या दिसून येत आहेत. सुरक्षा दलाच्या तिन्ही विभागांकडून पूर्णपणे सज्जता बाळगली जात असतानाच प्रशासकीय पातळीवरही वेगवेगळे निर्णय घेऊन पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान, शनिवारी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर नौदलप्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेत दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात केलेल्या युद्धसरावाची रितसर माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींशी अब्दुल्ला यांची ही पहिलीच भेट होती. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे 30 मिनिटे चालली. बैठकीत अलीकडील पहलगाम हल्ला आणि त्यानंतर उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थितीसह अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा आव्हाने वाढत असताना आणि केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने ओमर अब्दुल्ला आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट झाली आहे.
75 जणांना अटक
पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी पीएसए (सार्वजनिक सुरक्षा कायदा) अंतर्गत 75 जणांना अटक केली आहे. याची पुष्टी आयजी व्ही. के. यांनी शनिवारी केली. ‘पीएसए’ अंतर्गत आरोपीला दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवण्याची तरतूद आहे. अटकेतील बहुतांश जणांवर या कलमांतर्गंत कारवाई झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस व कठोर पावले उचलल्याचे दिसत आहे.
शोध मोहिमेची व्याप्ती जम्मूपर्यंत
बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती एनआयएने पूर्वीपेक्षा जास्त वाढवली आहे. शोधमोहीम दक्षिण काश्मीरच्या पलिकडे जम्मूतील चिनाब आणि पीर पंजाल पर्वतरांगांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये पूंछ आणि राजौरी भागांचाही समावेश करण्यात आला आहे. या भागात आता शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या 11 दिवसांनंतर संशयित आता दक्षिण काश्मीर व्यतिरिक्त इतर भागात लपले असावेत, असे मानले जात आहे. त्यामुळे तपास आणि शोध मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वीच पळून जाण्याचा मार्ग आखण्यात आला होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे, दहशतवाद्यांचे ठिकाण शोधण्यात अजूनही अडचण येत आहे.
शाळकरी मुलांचा बंकरमध्ये आश्रय
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिह्यातील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारामुळे सरकारी माध्यमिक शाळेतील सारुलाच्या मुलांनी बंकरमध्ये आश्रय घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच ठेवले आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जम्मू काश्मीरच्या पाच भागातही युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने अन्य ठिकाणी छुपे बंकर तयार करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हद्दीतून गोळीबार वाढल्यास नव्या बंकर्सचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तानसोबत तणाव दिवसेंदिवस वाढत असून फिरोजपूरच्या सीमावर्ती गावांमधील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. तसेच पाकिस्तानी हद्दीतील सीमावर्ती भागातील लोकही सुरक्षित ठिकाणी आपल्या साहित्यासह रवाना होत असल्याचे सॅटेलाईट दृश्यांमध्ये दिसून आले आहे.
Comments are closed.