MPL 2025: असे असेल प्ले ऑफ्सचे वेळापत्रक, जाणून घ्या लगेच

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. तब्बल 30 सामने या साखळी फेरीत खेळले गेले. 4 जून पासून सुरू झालेली ही स्पर्धा आता प्ले ऑफ्सपर्यंत पोहोचली आहे. चार संघांच्या प्ले ऑफ्समध्ये कशा पद्धतीने सामने होतील, हे आपण माहीत करून घेऊया.

साखळी फेरीच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे एकही सामना खेळला गेला नाही. त्यामुळे पीबीजी कोल्हापूर टस्कर्स प्ले ऑफ्स गाठणारा चौथा संघ बनला. यापूर्वी ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स यांनी प्ले ऑफ्समधील आपली जागा निश्चित केली होती. तर, रत्नागिरी जेट्स व सातारा वॉरियर्स यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. विशेष म्हणजे रत्नागिरी जेट्स स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामाचे विजेते आहेत.

प्ले ऑफ्समध्ये पहिला सामना क्वालिफायर 1 होईल. गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहिलेल्या ईगल नाशिक टायटन्स व दुसऱ्या क्रमांकावरील पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. शुक्रवारी (20 जून) दुपारी दोन वाजता हा सामना होईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे. तर, पराभूत संघाला क्वालिफायर 2 सामना खेळावा लागेल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल.

शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात एलिमिनेटर सामना होणार आहे. गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रायगड रॉयल्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान हा सामना रंगेल. या सामन्यातील विजेत्याला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध क्वालिफायर 2 सामना खेळावा लागेल. तर एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. पावसामुळे सामना पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकावरील रायगड रॉयल्सला क्वालिफायर 2 मध्ये बढती दिली जाईल.

क्वालिफायर 2 सामना शनिवारी (21 जून) सायंकाळी 7 वाजता होईल. क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ व एलिमिनेटरमधील विजेता या सामन्यात समोरासमोर येतील. या सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात जागा मिळवता येईल. तर, पराभूत संघाला स्पर्धेतून घरचा रस्ता धरावा लागेल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास क्वालिफायर 1 मधून आलेल्या संघाला अंतिम सामन्यात स्थान दिले जाईल.

एमपीएल 2025 चा अंतिम सामना 22 जून रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. अंतिम सामना पावसामुळे पूर्ण न झाल्यास साखळी करीत पुढे असलेल्या संघाला विजेता घोषित केला जाईल. यापूर्वी एमपीएल 2023 मध्य रत्नागिरी जेट्सला याच निकषावर विजेते बनवण्यात आले होते.

Comments are closed.