MPL 2025: कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? रायगड आणि पुण्याला इतिहास रचण्याची संधी
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ची समाप्ती जवळ आलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या नियोजनाने होत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (22 जून) पार पडेल. तत्पूर्वी, क्वालिफायर 2 सामना शनिवारी (21 जून) खेळला जाईल. रायगड रॉयल्स व पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान होणाऱ्या या सामन्यातील विजेता प्रथमच अंतिम फेरीत दाखल होईल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील.
पुणेरी बाप्पा संघाने पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफ्समध्ये मजल मारली होती. मात्र, दोन्ही वेळी त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आलेले. तिसऱ्या हंगामात त्यांनी 4 विजय व 3 रद्द झालेल्या सामन्यातील प्रत्येकी एक गुण असे 11 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावलेला. त्यामुळे त्यांना क्वालिफायर 1 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने त्यांना पराभूत करत अंतिम फेरीत जागा नक्की केली. त्यामुळे पुणेरी बाप्पा आता पुन्हा एकदा अंतिम फेरीतील प्रवेशासाठी खेळताना दिसेल.
दुसऱ्या बाजूला रायगड रॉयल संघासाठी तीन हंगामातील ही पहिलीच प्ले ऑफ्स आहे. पहिल्या दोन हंगामात ते अखेरच्या स्थानी राहिले होते. यावेळी ऋषभ राठोड याच्या नेतृत्वात खेळताना रायगड संघाने तीन विजय संपादन केले. तसेच, रद्द झालेल्या तीन सामन्यातील 3 गुण यासह ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एलिमिनेटर सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्सला मात देत त्यांनी क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे.
पुणेरी बाप्पा संघाचे यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, ऋषिकेश सोनवणे, अद्वय शिदये व कर्णधार यश क्षीरसागर हे फलंदाज सातच्यापूर्ण कामगिरी करत आहेत. तर, सुरज शिंदे फिनिशर म्हणून भूमिका निभावतोय. अष्टपैलू रामकृष्ण घोष, निकीत धुमाळ व सचिन भोसले यांनी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली असून, रोशन वाघसरे आणि सोहम जमाले फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाला हैराण करत आहेत. दुसऱ्या बाजूला रायगडसाठी विकी ओस्तवाल, सिद्धेश वीर, ऋषभ राठोड व नीरज जोशी हे फलंदाज फॉर्ममध्ये दिसून आलेत. गोलंदाजी तनय संघवी, निखिल कदम व शुभम कदम सातत्याने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणताना दिसून आले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. शनिवारी सायंकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे. आतापर्यंत फलंदाजांना पोषक ठरलेल्या या खेळपट्टीवर या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होऊ शकते. या सामन्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नसून, सर्व चाहत्यांना मोफत प्रवेश असेल.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
पुणेरी बाप्पा- यश नाहर, मुर्तझा ट्रंकवाला, ऋषिकेश सोनवणे, सोहन जमाले, अद्वय शिदये, यश क्षीरसागर (कर्णधार), सुरज शिंदे, रामकृष्ण घोष, निकित धुमाळ, रोशन वाघसरे, सचिन भोसले
रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, विकी ओस्तवाल, हर्ष संघवी, नीरज जोशी, ऋषभ राठोड (कर्णधार), ओमकार खाटपे, अजय बोरुडे, तनय संघवी, सागर जाधव, शुभम कदम, निखिल कदम,
Comments are closed.