MPL 2025: 'सुपर संडे'ला तीन सामन्यांची मेजवानी, पाहा कोण कोण भिडणार

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रविवारी (15 जून) क्रिकेटप्रेमींना सामन्यांचा ट्रिपल डोस मिळणार आहे. स्पर्धेचे सर्व सहा संघ रविवारी मैदानात उतरतील. त्यानंतर स्पर्धेतील गुणतालिकेत मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढू शकतो.

रविवारी सकाळच्या सत्रात पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स असा होईल. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, पहिल्या दोन क्रमांकावर काबिज आहेत. नाशिक संघाने आतापर्यंत सहा सामने खेळताना पाच विजय मिळवलेत. तर, पुणेरी बाप्पाच्या नावे सहा सामन्यातच तीन‌ विजय व एका निकाल न लागलेल्या सामन्यामुळे 7 गुण आहेत. सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात नाशिक संघाकडून अर्शिन कुलकर्णी, प्रशांत सोलंकी व मुकेश चौधरी या मोठ्या खेळाडूंवर नजर असेल. तर, पुणेरी बाप्पा संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारे सुरज शिंदे, रामकृष्ण घोष व निकित धुमाळ हे योगदान देताना दिसतील. ईगल नाशिक टायटन्स संघाने या सामन्यात विजय संपादन केल्यास, ते प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनतील.

दुपारच्या सत्रात दिवसातील दुसरा सामना खेळला जाईल. दोन वेळचे विजेते रत्नागिरी जेट्स व सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. पहिल्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर रत्नागिरी संघाने पुनरागमन करत सलग दोन विजय मिळवले आहेत. तर, सातारा वॉरियर्सला आपल्या पाच सामन्यात फक्त एक विजय संपादन करता आला आहे. या सामन्यात सातारा वॉरियर्स पराभूत झाल्यास, त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार असेल. रत्नागिरी जेट्स संघाची मदार कर्णधार अझीम काझी, अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर व अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव यांच्यावर असेल. तर, दुसऱ्या बाजूला सातारा वॉरियर्स कर्णधार सौरभ नवले, राजवर्धन हंगरगेकर व मेहुल पाटील यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असणार आहे. हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल.

दिवसातील अखेरच्या सामन्यात विजयी लय सापडलेला रायगड रॉयल्स व स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेला पीबीजी कोल्हापूर टस्कर्स हे भिडतील. रायगड रॉयल्सने आत्तापर्यंत पाच सामने खेळताना तीन विजयासह सहा गुण कमावले आहेत. तर, कोल्हापूर टस्कर्सने सहा सामने खेळताना केवळ एक विजय मिळवला आहे. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. या सामन्यात पराभूत झाल्यास कोल्हापूर संघाच्या प्ले ऑफ्स आशांना मोठा धक्का बसू शकतो. रायगड रॉयल्स संघासाठी सिद्धेश वीर, कर्णधार ऋषभ राठोड व विकी ओस्तवाल हे निर्णायक कामगिरी बजावू शकतात. तर, कोल्हापूर संघासाठी कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे व श्रेयस चव्हाण यांना आपला खेळ उंचावावा लागेल.

Comments are closed.