एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार – TMarathiNews

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

पुण्यात विद्यार्थ्यांचे 10 दिवस आंदोलन

पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि परीक्षांमधील गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. सलग 10 दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले.

अध्यक्षांच्या रजेच्या निर्णयानंतर आंदोलन मागे

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन आणि अध्यक्षांच्या रजेचा निर्णय या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, भीमनवार यांच्या रजेच्या कालावधीत आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या आगामी परीक्षा, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत आयोग कोणती पावले उचलतो, याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.