धोनीचा शेवट जवळ? सीएसकेच्या आयपीएल 2026 स्ट्रॅटेजीतून ‘माही रिटायरमेंट’चे स्पष्ट संकेत
आयपीएल 2026 च्या लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि एमएस धोनीच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. धोनी आता रिटायर होणार का? सीएसकेने यावेळी केलेली गुंतवणूक आणि बदललेली रणनीती पाहता, माहीच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट जवळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
कधी ‘डॅड आर्मी’ म्हणून टीका झालेल्या CSK ने आता पूर्णपणे वेगळी दिशा पकडली आहे. मागील काही हंगामांतील सातत्याने खराब कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनाला बदलाची गरज जाणवली आणि त्यामुळेच IPL 2026 साठी ‘GEN Z’ खेळाडूंवर मोठा भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील दोन मोठे निर्णय धोनीच्या रिटायरमेंटकडे स्पष्ट इशारा करणारे मानले जात आहेत.
एमएस धोनी त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. CSK मध्ये त्याची जागा भरणे अशक्य असले, तरी भविष्यासाठी पावले उचलणे गरजेचे होते. त्याच पार्श्वभूमीवर CSK ने विकेटकीपर फलंदाजांवर तब्बल 32.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा आकडा स्वतःच सांगतो की, धोनीनंतरच्या काळाची तयारी सुरू झाली आहे.
IPL 2026 मिनी-ऑक्शनमध्ये CSK ने 19 वर्षीय कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांना विकत घेतले. तो IPL इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात महाग अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला. याआधी CSK ने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड करून संजू सॅमसनला संघात घेतले होते, ज्याची किंमत 18 कोटी रुपये होती.
याशिवाय CSK ने आधीच उर्विल पटेलला रिटेन केले आहे, जो देखील विकेटकीपर फलंदाज आहे. परिणामी, CSK कडे आता चार विकेटकीपर फलंदाज उपलब्ध आहेत. 2008 पासून विकेटमागे जवळपास पूर्णपणे धोनीवर अवलंबून असलेल्या CSK साठी ही बाब ऐतिहासिक बदल दर्शवणारी आहे.
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही लिलावादरम्यान या धोरणात्मक बदलाची कबुली दिली. ते म्हणाले, “आम्ही हे गृहीत धरत होतो की एका टप्प्यावर धोनी पुढे जाईल. संजू हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे आणि तो ही भूमिका उत्तम पार पाडू शकतो.”
एमएस धोनींनी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहेत. मात्र, CSK ची सध्याची वाटचाल पाहता, IPL 2026 हा ‘माही’चा अखेरचा हंगाम ठरू शकतो, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
Comments are closed.