IPL 2026: महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा; संपूर्ण सीझन खेळण्याबाबत CSK च्या CEO ने दिली मोठी अपडेट

आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून 28 मार्चपासून या स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीमचे CEO काशी विश्वनाथन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यापूर्वीच त्यांनी धोनी आगामी हंगामात खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते, आता त्यांनी आणखी एक अपडेट दिली आहे.
CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल 2026 चे सर्व सामने खेळेल अशी आशा आहे. मात्र, मैदानात त्याची नेमकी भूमिका काय असेल, याचा अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंट घेईल. आयपीएलचे हे 19 वे पर्व 28 मार्चपासून सुरू होत असून सर्व संघांनी आपले सराव शिबीर (Training Camp) सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले खेळाडू लवकरच आपापल्या संघांसोबत सराव सुरू करतील. वाढत्या वयामुळे धोनी सर्व सामने खेळू शकेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती, पण विश्वनाथन यांनी ही शंका फेटाळून लावली आहे.
जेव्हा विश्वनाथन यांना विचारण्यात आले की, संघात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) रूपात आणखी एक यष्टिरक्षक-फलंदाज आल्यामुळे धोनीची भूमिका काय असेल? त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, हा एक ‘क्रिकेटिंग निर्णय’ आहे जो प्रशासकीय स्टाफऐवजी प्रशिक्षक आणि तांत्रिक स्टाफ घेईल. धोनी केवळ फलंदाज म्हणून खेळणार, यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून की ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून, हे सर्व टीम मॅनेजमेंट ठरवेल.
भारतीय टीमला टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसन आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांचे विश्वनाथन यांनी भरभरून कौतुक केले. भारताने सलग वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, आमच्या टीमचे दोन खेळाडू, संजू आणि शिवम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते चेन्नई सुपर किंग्ससाठी देखील या हंगामात उत्तम कामगिरी करतील. सध्या संघाचा सराव चांगल्या पद्धतीने सुरू असून कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.