IPL 2026: धोनीचे चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन झाल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागणार? जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघाचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्या मते, दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनीचे पुनरागमन 18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) काही कठीण प्रश्न उभे करू शकते. 44 वर्षीय धोनी पायाच्या दुखापतीमुळे (Calf Injury) या सीझनचे पहिले 5 सामने खेळू शकलेला नाही. धोनी आता पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या जवळ असून तो लवकरच मैदानात दिसू शकतो. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याबाबत साशंकता असली, तरी त्यानंतरच्या सामन्यांसाठी तो उपलब्ध असू शकतो.

बद्रीनाथने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, धोनीची उपस्थिती ही ‘रुममधील हत्तीसारखी’ (एक मोठी गोष्ट जिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही) आहे. तो कोणाची जागा घेणार हा मोठा प्रश्न आहे, कारण संघाने नुकताच आपला ताळमेळ (Combination) बसवला आहे.

चेन्नईची या हंगामाची सुरुवात खराब झाली होती, त्यांनी पहिले तिन्ही सामने गमावले होते. मात्र, गेल्या दोन सामन्यांतील विजयामुळे संघाने आपली लय परत मिळवली आहे. बद्रीनाथच्या मते, जर धोनीला परतण्यास वेळ लागला तरी चेन्नईचा संघ सावरलेला आहे. तरीही, यष्टीमागे धोनी असण्याने संघाला मोठा फायदा होईल, मग संजू सॅमसनला केवळ क्षेत्ररक्षक (Fielder) म्हणून का खेळावे लागेना.

बद्रीनाथ पुढे म्हणाले, जर तो आता परतला नाही तरी संघ ठीक आहे. चाहत्यांना तो परत हवा आहे, पण व्यवस्थापन याकडे कसे बघते हे माहित नाही. तो परतला तर नक्कीच संघाचे मनोबल वाढेल. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, दुखापतीतून सावरल्यानंतर धोनी ‘इम्पैक्ट प्लेयर’ (Impact Player) म्हणून संघात येऊ शकतो. यामुळे प्लेइंग इलेव्हनचा समतोल बिघडणार नाही. तो एक ‘फिनिशर’ म्हणून फलंदाजीला येऊ शकतो, ज्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments are closed.