एसटीच्या यांत्रिक विभागात कर्मचारी कपातीचा घाट, आर्थिक बचतीच्या नावाखाली वाहतूक सुरक्षेकडे डोळेझाक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागात कर्मचारी कपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या पदांचा सविस्तर आढावा घेऊन विभागीय स्तरावरून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याला तीव्र विरोध होत असून आर्थिक बचतीच्या नावाखाली एसटीच्या वाहतूक आणि प्रवासी सुरक्षेकडे डोळेझाक केली जात असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे.

सध्या राज्यभरातील एसटीच्या प्रत्येक आगार व विभागीय कार्यशाळांमध्ये मंजूर कर्मचाऱ्यांपेक्षा कार्यरत कर्मचारी कमी आहेत. अनेक आगार आणि कार्यशाळांमध्ये अप्रशिक्षित शिकाऊ उमेदवारांवर यांत्रिक कामाची जबाबदारी सोपवली जात आहेत. त्याचा वाहनाच्या यांत्रिक कामाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पदनिहाय कर्मचारी संख्या वाढवणे आवश्यक असताना कर्मचारी कपातीच्या हालचाली सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बीएस-6 मानांकनाच्या बसेस दाखल होत आहेत. त्या गाडय़ांबरोबर जुन्या वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा ताण यांत्रिक कर्मचाऱयांवर पडत आहे. प्रवासादरम्यान अचानक वाहनात बिघाड झाल्यास तसेच अपघात झाल्यास तेथेही यांत्रिक विभागाच्याच कर्मचाऱयांना मदतीसाठी पुढे जावे लागते. याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी सुरक्षिततेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

एसटी कामगार सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

यांत्रिक कर्मचारी कपातीमुळे एसटीची वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याऐवजी बसगाडय़ा रस्त्यावर उभ्या राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे कर्मचारी कपातीचा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा संघटनेतर्फे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी दिला आहे.

Comments are closed.