एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक नाही! महामंडळाचे धक्कादायक परिपत्रक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी महामंडळातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची आर्थिक देयके देण्याबाबत वेळकाढूपणा केला जात असतानाच महामंडळाने शुक्रवारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक परिपत्रक जारी केले. महामंडळातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेल्या चालक, कारागीर-क, सहाय्यक कारागीर, सहाय्यक व स्वच्छक पदातील कर्मचाऱ्यांना यापुढे करार पद्धतीने नेमणुका न देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

सद्यस्थितीत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पुढील दोन-तीन वर्षे करार पद्धतीने काम करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक व्यवस्थापन करताना कर्मचाऱ्यांना आधार मिळत होता. मात्र या करार पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुका अचानक बंद करीत महामंडळाने शुक्रवारी तसे परिपत्रक जारी केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सध्या करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कराराचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत करारातील अटी-शर्तींच्या अधीन राहून कार्यरत ठेवावे, तसेच कराराची मुदत संपल्यानंतर संबंधित कराराचे नूतनीकरण करू नये, असे महामंडळाने परिपत्रकात म्हटले आहे. अपुऱया मनुष्यबळामध्ये कार्यरत असलेल्या एसटीमध्ये नवीन भरती केली जात नाही. असे असताना आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नेमणुका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मग अधिकाऱ्यांच्या नेमणुकांना मुभा का?

एसटी महामंडळाने वर्ग-3 आणि वर्ग-4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका न करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र महामंडळाच्या वरिष्ठ पदांवरील अनेक सेवानिवृत्त अधिकारी करार पद्धतीने पुन्हा सेवेत आहेत. त्यांच्या नेमणुकांना मुभा का, असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे.

Comments are closed.