Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, अखेर जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून (23 जानेवारी) जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत.
लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यासाठी 18 फेब्रुवारीला सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला 98 कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती. ही रक्कम महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागानं याबाबत माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींच्या संख्येत घट?
डिसेंबर 2025 महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या 14 तारखेदरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळतंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 ला करण्यात आली होती. तेव्हा लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 46 लाखांच्या दरम्यान होती. त्यानंतर राज्य सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 1 कोटी 90 लाख महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी योग्य केवायसी भरणाऱ्या 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागनं डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवले होते.
ई केवायसी दुरुस्तीसाठी संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळं महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. आता ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून जानेवारी 2026 चा हप्ता विचारात घेतल्यास 19 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात.
Comments are closed.