पाकिस्तान क्रिकेट बोर्डला PSL फ्रँचायझीकडून मोठा धक्का; मालकांनी दिला टीमला रामराम

पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील मुल्तान सुल्तांसचे बिनधास्त आणि वेगळी दृष्टी ठेवणारे मालक अली खान तरीन यांनी अखेर लीगला अलविदा म्हणत माघार घेतली आहे. PCB आणि PSL अधिकाऱ्यांशी सुरू असलेले त्यांचे दीर्घकाळचे मतभेद त्यांनी या निर्णयाने संपवले आहेत. बोर्डाच्या कारवाईनंतर आणि सातत्याने वाढत चाललेल्या तणावानंतर तरीन यांनी चाहत्यांना एक भावुक संदेश देत सांगितले की तत्त्वांशी तडजोड करण्यापेक्षा दूर जाणे त्यांना अधिक योग्य वाटले. “मी नेहमी प्रामाणिक राहिलो, नियमांना कधी झुकलो नाही. जर राहण्यासाठी माझ्या मूल्यांवर पाय ठेवावा लागला, तर निघून जाणेच उत्तम,” असे त्यांनी लिहिले.

तरीन आणि PCB यांच्यातील संघर्ष नवीन नव्हता. त्यांनी अनेकदा PCBच्या पॉलिसीवर उघडपणे टीका केली होती. शो-कॉज नोटिस मिळाल्यावर त्यांनी ते सार्वजनिकरीत्या फाडत मोठे वादंग निर्माण केले. फ्रेंचायझीच्या रिन्यूअलच्या वेळी PCB ने त्यांना एक्स्टेंशन न देणे, EY व्हॅल्युएशन रिपोर्ट्स न शेअर करणे, तसेच संवाद न ठेवणे यामुळे त्यांचा रोष अधिक वाढला. एका सूत्रानुसार, फ्रेंचायझी करार निलंबित किंवा रद्द केला नव्हता, त्यामुळे मुल्तान सुल्तांस नियमांनुसार कार्यरत होती; अशातही आवश्यक माहिती न देणे हे PCBचे करारभंग मानले जात आहे.

2018 मध्ये UAEच्या शॉन ग्रुपकडून मालकी त्यांच्याकडे आली आणि तरीन यांनी सात वर्षांत अंदाजे 44 दशलक्ष डॉलर्स PCB ला दिले. जवळपास 7.2 अब्ज पाकिस्तानी रुपये गुंतवून त्यांना केवळ 1.7 अब्ज रुपयांचा परतावा मिळाला. तरीही टीमबद्दलचे प्रेम अबाधित राहिले. 2021 चे विजेतेपद आणि सलग तीन हंगामांतील फायनलसह मुल्तान सुल्तांस सातत्याने चमकत राहिली. आता PCB दोन नव्हे तर तीन नवीन मालक शोधत असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑक्शन होणार आहे.

Comments are closed.