कोटय़वधीचा मत्स्य व्यवसाय कोकणात; मात्र नागपूरच्या मत्स्य विद्यापीठावर 18 कोटींची खैरात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकणाला विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. मासेमारीच्या व्यवसायातून कोटय़वधींची उलाढाल आणि निर्यातीतून परकीय चलन मिळते. या कोकणातील मत्स्य व्यवसायावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. पण राज्य सरकारने नागपूरमध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठावर तब्बल 18 कोटी 95 लाख रुपयांची खैरात केली आहे.

महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात कोकणचे एकूण जलक्षेत्र 3.25 लाख हेक्टरवर पसरलेले आहे. कोकणातील मुख्य व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन मासेमारी आहे. या मच्छीमारांना गेली अनेक वर्षे अत्यंत जटिल समस्या भेडसावत आहेत. याचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन केली होती. या समितीने केरळला भेट दिली होती. त्यात विविध मत्स्य विज्ञान संस्थांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर या समितीने फेब्रुवारी 2011मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शिफारशींचा अहवाल सादर केला. त्यात रत्नागिरीत मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. पण अजून कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन झालेले नाही.

कोकणात मत्स्य विद्यापीठ कधी?

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणावरील चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी कोकणातील मत्स्य विद्यापीठाचा विषय उपस्थित केला होता. येथील आंबा, काजू, मासळी निर्यातीतून डॉलर मिळतात. ही डॉलर भूमी आहे, असे वर्णन केले होते. यापूर्वीच्या प्रत्येक अधिवेशनात भास्कर जाधव यांनी मत्स्य विद्यापीठाचा विषय मांडला होता.

सर्वाधिक मत्स्य उत्पादन

महाराष्ट्रातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी 72 टक्के मत्स्य उत्पादन कोकण किनारपट्टीवर होते. त्यातून सरासरी 1 हजार 200 कोटी रुपयांचे मत्स्य उत्पादन निर्यात होते अशी आकडेवारी आहे.

राजकीय निर्णय

कोकणातून कोटय़वधी रुपयांची मासळी निर्यात होऊन देशाला बहुमूल्य परकीय चलन मिळते. पण तरीही मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये स्थापन केले हा संपूर्णपणे राजकीय निर्णय असल्याचे जाणकार सांगतात.

Comments are closed.