मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग रिक्षावर कोसळला; तीन ते चार जण जखमी
मुलुंड पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंड पश्चिमेकडील बांधकामादरम्यान मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. या भीषण अपघातात रिक्षामधील तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी, वॉर्ड स्टाफ आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसराला वेढा घातला असून येथील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. विशेषतः मेट्रो बांधकामादरम्यान सुरक्षा मानकांचे गांभीर्याने पालन करण्यात आले होते का, यावर सध्या तपास सुरु करण्यात आला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
Comments are closed.