मुलुंडमध्ये क्रीडा संकुलाच्या जागी पेट्रोल पंप; भूखंडाच्या आरक्षण बदलाला विरोध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुलुंड पूर्व येथे क्रीडा संकुल/स्टेडियमसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचे आरक्षण बदलून ती पेट्रोल पंपासाठी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर करण्यात आला. विरोधकांनी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला जोरदार विरोध केला.

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या पत्रानंतर शासनाने मुलुंड पूर्व येथे पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “मुलुंड पूर्व ते घाटकोपर पूर्वदरम्यान पेट्रोल पंपाची पुरेशी सुविधा नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांना पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मुलुंड पश्चिम किंवा ठाण्याच्या दिशेने जावे लागते. परिणामी, पेट्रोल पंपाची मागणी करण्यात आली आहे,” असा दावा सत्ताधारी नगरसेवकांनी केला.

शिवसेना नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी प्रस्तावावर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. “एक वर्षापूर्वी २ हजार चौरस मीटरचा भूखंड सीएनजी पंपासाठी दिला होता. मात्र, आता पुन्हा सुमारे ४ हजार चौरस मीटर जमिनीचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव का आणला आहे?” असा सवाल करत विठ्ठल लोकरे यांनी हा प्रस्ताव मागे घेण्याची उपसूचना मांडली.

“वैयक्तिक स्वार्थासाठी हा प्रस्ताव आणला असून प्रस्तावित जमिनीच्या बाजूला शाळा आहे,” असा महत्त्वाचा मुद्दा सचिन पडवळ यांनी उपस्थित केला. “गरजेपेक्षा जास्त जागा पेट्रोल पंपाला दिली जात आहे. तब्बल ४ हजार चौरस मीटरची जागा कोणत्या अधिकारात पेट्रोल पंपासाठी दिली जात आहे? तसेच प्रस्तावात क्रीडा संकुल किंवा स्टेडियमसाठी पर्यायी जागा दिलेली नाही,” असे मुद्दे नगरसेविका विशाखा राऊत यांनी मांडले.

“या प्रस्तावासाठी सूचना व हरकती का मागवल्या नाहीत?” असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी विचारत उपसूचनेला पाठिंबा दिला.

या आरक्षित जमिनीचा वापर, भूखंडाचा आकार आणि याआधी उपलब्ध करून दिलेली जमीन या मुद्द्यांवर प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

Comments are closed.