Mumbai Accident – होळीसाठी फुलं आणायला गेले अन् शिवनेरी बसने चिरडलं; अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी

सणउत्सवाचे दिवस सुरू असून सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना मुंबईत बुधवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघाताची घटना मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली. प्रणय बोडके (29), करण शिंदे (29) आणि दुर्वेश गोरडे अशी या अपघातातील तिघांची नावे आहे. तीन मित्र दुचाकीवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. यावेळी अचानक शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आली. आणि या शिवनेरी बसने तिघांना चिरडले.

दरम्यान, या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. या तिघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान प्रणय बोडके याचा मृत्यू झाला. तर इतर दोघे दुर्वेश आणि करण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघात घडताच चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तेथील उपस्थितांनी चालकाला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इकबाल शेख असे चालकाचे नाव असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस MH12VF3305 चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments are closed.