मुंबई-अहमदाबाद मृत्यूचा महामार्ग, 18 महिन्यांत 65 जणांचा बळी; व्हाईट टॉपिंगनंतरही दुर्घटनांचे सत्र कायम

सचीन जगताप, पालघर
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा आता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 18 महिन्यांत 151 अपघात घडले असून त्यामध्ये 67 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या महामार्गावर व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही दुर्घटनांचे सत्र कायम राहिल्याने प्रवासी आणि वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकडेवारीनुसार 2024 या वर्षभरात छोटे-मोठे मिळून 71 अपघात झाले होते. यामध्ये 31 जण गंभीर जखमी तर 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर यंदा जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत या फक्त आठ महिन्यांतच अपघातांचा आकडा 80 वर पोहोचला आहे. यामध्ये 48 जण जखमी तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

अच्छाड ते घोडबंदर या 121 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम झाले असले तरी दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही.
डिझाईनमधील अनेक त्रुटी, अपुरे सुरक्षा उपाय, वळणांवरील चुकीची रचना आणि वाहतुकीवरील नियंत्रणाचा अभाव आदी बाबी अपघातांना निमंत्रण देत आहेत.
दररोज वाढणाऱ्या जीवितहानीमुळे या महामार्गावर तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. अपघातांची साखळी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणती ठोस भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
15 किमीच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात
मनोर-सातिवली-वरई-ढेकाळे-वाघोबा खिंडी या सुमारे पंधरा किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात घडले आहेत. मेंढवन खिंड तसेच वाडा-खडकोना सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मध्य दुभाजक तोडून केलेला रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांना सोयीचे व्हावे म्हणून केलेली ही रचना प्रत्यक्षात अपघातांना आमंत्रण देत असल्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.