मुंबईत गतवर्षीपेक्षा यंदा डिसेंबरमध्ये चांगली हवा! ‘एक्यूआय’ 100 च्या सरासरीत

मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत हवेचा दर्जा 1 ते 16 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत चांगला असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत एअर क्वालिटी इंडेक्स 167 ते 158 दरम्यान म्हणजेच ‘मध्यम दर्जाची हवा’ या श्रेणीत होता, मात्र याच कालावधीत ‘एक्यूआय’ 105 ते 113 इतका म्हणजेच समाधानकारक राहिला आहे. यासाठी पालिकेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीचा दाखला दिला आहे.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया उपाययोजनांचे आणि नागरिकांकडून मिळणाऱया सहकार्याचे समाधानकारक परिणाम दिसत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. हवा निर्देशांक पाहण्याकरिता नागरिकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेली अधिकृत आकडेवारीच बघावी. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे https://cpcb.nic.in हे संकेतस्थळ व भ्रमणध्वनीवर उपलब्ध असणारे ‘समीर’ हे अधिकृत ऍप वापरावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

असे होतेय काम

प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने बांधकामे, प्रकल्प आणि नागरिकांसाठी 28 प्रकारची नियमावली जारी केली आहे. शिवाय रस्त्यांची स्वच्छता, मिस्टिंग मशीनद्वारे फवारणी, नियम न पाळणाऱया बांधकामांना कारणे दाखवा, स्टॉप वर्क नोटीस देण्यात येत आहे. उघडय़ावर कचरा जाळणे, डेब्रिज टाकण्यावर बंदी घालण्यात आली असून यावर नजर ठेवण्यासाठी 24 वॉर्डसाठी एकूण 95 टीमची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

दोन वर्षांचा तुलनात्मक ‘एक्यूआय’
(कंसात 2024 ची श्रेणी)
1 डिसेंबर – 105 (167)
2 डिसेंबर – 126 (174)
3 डिसेंबर – 128 (129)
4 डिसेंबर – 138 (139)
5 डिसेंबर – 124 (154)
6 डिसेंबर – 116 (148)
7 डिसेंबर – 113 (126)
8 डिसेंबर – 120 (125)
9 डिसेंबर – 115 (112)
10 डिसेंबर – 101 (131)
11 डिसेंबर – 105 (139)
12 डिसेंबर – 112 (137)
13 डिसेंबर – 115 (128)
14 डिसेंबर – 131 (134)
15 डिसेंबर – 122 (159)
16 डिसेंबर – 113 (158)

Comments are closed.