धूळ नियंत्रण मोहिमेत 70 किमी रस्ते चकाचक, धूळ नियंत्रण मोहिमेत 69.55 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता
मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी 69.55 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. यामध्ये एकूण 39.75 टन धूळ आणि 115 टन बांधकाम व पाडकाम राडारोडा संकलित करण्यात आला.
मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत महानगरपालिकेच्या 26 प्रशासकीय विभागांतील 146 रस्त्यांवर स्वच्छता करण्यात येत आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला जोडमार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोड मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग, घाटकोपर-मानखुर्द मार्ग, एस. व्ही. रोड, लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव-मानखुर्द मार्ग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रमुख मार्गांशिवाय महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांतील धूळप्रवण रस्ते आणि परिसरात स्वच्छता व धूळ नियंत्रणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
‘धूळ’मुक्तीसाठी वॉर्डला 15 लाख
वायू प्रदूषण रोखण्यासह ‘धूळ’ मुक्त मुंबईसाठी महापालिका विशेष मोहीम राबवणार आहे. 29 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक आणि धूळ साचणाऱया ठिकाणांची स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून या मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागाला 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्गांसह धूळप्रवण रस्त्यांची स्वच्छता करून हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), बीकेसी कनेक्टर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.
Comments are closed.