एसटी आरक्षण केंद्राच्या श्रेयासाठी कुरघोडी! अर्धवट काम, मूलभूत सुविधांची वानवा तरी उद्घाटन उरकले, कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

एसटीच्या वातानुकूलित आरक्षण केंद्राच्या श्रेयासाठी कुरघोडी करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरक्षण केंद्राचे अर्धवट काम तसेच आवश्यक सुविधा नसताना परिवहन मंत्र्यांनी केंद्राचे उद्घाटन केले. उद्घाटनाची ही घाई प्रवाशांच्या सोयीसाठी की श्रेयाच्या राजकारणासाठी? असा प्रश्न उपस्थित होत असून महामंडळातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या कार्यालयाच्या तळमजल्याला असलेल्या बसस्थानकाच्या आवारात वातानुकूलित आरक्षण केंद्राचे काम केले आहे. केंद्रामध्ये एसीची व्यवस्था, पुरेसे संगणक आदी सुविधा अद्याप उपलब्ध केलेल्या नाहीत. केंद्राच्या भिंतींमधून पाणी झिरपत असल्याने त्या ओल्या झाल्या आहेत. अशा स्थितीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एका युनियन नेत्याच्या सूचनेनंतर तातडीने आरक्षण केंद्र गाठले आणि केंद्राच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. कंत्राटदाराने या आरक्षण केंद्राचे काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा आरोप माजी आमदार यामिनी जाधव यांनी अलीकडेच केला होता. महापालिकेने त्यांच्या निधीच्या सहाय्याने आरक्षण केंद्र उभारणीचे काम केले. असे असताना त्यांनाही अंधारात ठेवून उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे परिवहनमंत्र्यांच्या घिसाडघाईवर एसटीच्या कर्मचारी आणि अधिकारीवर्गात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आरक्षण केंद्राच्या कामावरून परिवहनमंत्री सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. आरक्षण केंद्र तयार होऊन सहा ते आठ महिने झाले तरी केंद्राचे उद्घाटन का केले नाही? उद्घाटनाला ट्रम्प यांना बोलवायचे होते का? असा संताप व्यक्त करीत सरनाईक यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र केंद्राचे काम अर्धवट असताना श्रेयासाठी कुरघोडी केल्याने परिवहनमंत्री व त्यांना सूचना करणाऱ्या युनियन नेत्यावर जोरदार टीका होत आहे.

Comments are closed.