रागाच्या भरात बाप हैवान झाला, पोटच्या 9 वर्षांच्या पोराला गरम इस्त्रीचे चटके, अमानुष मारहाण अन्
मुंबई गुन्हे: भाईंदर पूर्व येथून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसर हादरला आहे. अवघ्या 9 वर्षांच्या मुलाने स्वतःच्या वडिलांवर अमानुष छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या शरीरावर गरम इस्त्रीचे चटके दिल्याने त्याच्या शरीरावर जखमा आढळल्याचाही आरोप करण्यात आलाय. काठीने मारहाण आणि उपाशी ठेवण्याचे प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. आईच्या कॅन्सरने झालेल्या निधनानंतर आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या या मुलाची ओढाताण झाली. शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार सांगितला. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. (Mumbai Crime)
नेमके घडले काय?
भाईंदर पूर्व येथे राहणाऱ्या 9 वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थी उत्तर प्रदेश मधील मथुरा भक्ती वेदांता गुरुकुल अँड इंटरनॅशनल स्कुल,येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून शाळेच्या वसतिगृहात राहतो.
विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, 2021 पासून अभ्यासातील किरकोळ चुकांवरून वडील त्याला मारहाण करत होते. 2024 मध्ये आईचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, वृंदावन येथील गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले.
20 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या सुट्टीत तो भाईंदर पूर्व येथील घरी आला असता, वडिलांनी अभ्यास व जेवणाच्या कारणावरून वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. कधी पोटभर जेवण दिले जात नव्हते, तर कधी जबरदस्तीने जास्त जेवण करण्यास भाग पाडले जात होते. विरोध केल्यास काठीने, ठोसे-लाथांनी मारहाण केली जात असल्याचे त्याने सांगितले.तसेच, रागाच्या भरात गरम इस्त्रीने शरीरावर चटके दिल्याने अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचा आरोप आहे.
अंगावर जखमा, चटके….
उपचारासाठी डॉक्टरांकडे न नेता घरीच मलम लावण्यात येत असल्याचेही मुलाने नमूद केले आहे. त्याला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते आणि वडील बाहेर जाताना दरवाजाला कुलूप लावत होते, असेही त्याचे म्हणणे आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा शाळेत सोडल्यानंतर शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार सांगितला. शाळा प्रशासनाने संपर्क साधल्यावर वडिलांनी जखमा गिझरच्या गरम पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.