पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक, तीन महिन्यांत 20 कोटींना गंडा

पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध महिलेला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 20 कोटींचा गंडा घातल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. तीन महिन्यांनी पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपींना ताब्यात घेतल्याचे कळते.
मुंबईतील रहिवासी असलेल्या एका 86 वर्षीय महिलेला एका आरोपीने फोन करून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. यानंतर आरोपीने महिलेला तिच्या आधारकार्डचा चुकीचा वापर होत असल्याचे सांगितले. महिलेचे आधार कार्ड आणि खासगी माहितीचा वापर करून नवीन बँक खातं उघडण्यात आलं असून, त्या खात्यावरून अवैध कामांसाठी पैसे ट्रान्सफर केले जात असल्याचं सांगून त्यांनी महिलेची फसवणूक केली.
तसेच याप्रकरणी महिलेविरोधात तक्रार दाखल केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यामुळे महिला घाबरली. आरोपींनी हे प्रकरण बंद करण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितलं. 26 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 या कालावधीत महिलेने वेगवेगळ्या खात्यांमध्ये 20.35 कोटी रुपये पाठवले. तीन महिन्यांनी आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने पोलिसात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.