Mumbai Crime News – घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवले, गोरेगाव पोलिसांकडून आरोपीला अटक

घरगुती वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली. रेखा खातून उर्फ रबिया शेख असे मतय महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला. मात्र गोरेगाव पोलिसांनी कसून शोध घेत रविवारी रात्री आरोपीला अटक केली.

रेखा उर्फ रबियाही मूळची कोलकात्याची असून वर्षभरापूर्वीच तिचा आरोपीसोबत प्रेमविवाह झाला होता. नोकरीसाठी दोघे पती-पत्नी सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आले होते. राम मंदिरजवळ दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते आणि मजुरीची कामं करत होते.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. रविवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला मारहाण सुरू केली. यावेळी रेखा आरडाओरडा करत असल्याने त्याने तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. यानंतर तिला नाक, तोंड, डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पळून गेला. काही वेळाने त्याने ओळखीतल्या राखी शेख या महिलेला फोन करून आपण पत्नीची चुकून हत्या केल्याचे कबूल केले. यानंतर राखीने तात्काळ रेखाच्या घरी धाव घेतली. दरवाजा उघडून पाहिले असता रेखा बेशुद्धावस्थेत आढळली. राखीने तिला तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

राखी शेखने गोरेगाव पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. राखीच्या जबाबावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. कसून शोध घेत रविवारी रात्री उशिरा आरोपी रॉयल शेखला अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.