रंगपंचमी सेलिब्रेशनदरम्यान टीव्ही अभिनेत्रीचा विनयभंग, सहकलाकाराविरोधात गुन्हा दाखल

होळीपार्टीदरम्यान टीव्ही अभिनेत्रीचा सहकलाकार असलेल्या अभिनेत्याने विनयभंग केल्याची घटना अंधेरीत घडली आहे. आरोपी अभिनेत्याने जबरदस्तीने रंग लावल्याने तिचा विनयभंग झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला. याप्रकरणी अभिनेत्रीच्या फिर्यादीवरून अभिनेत्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री सध्या अंधेरी येथील एका टेलिव्हिजन चॅनेलसाठी काम करते. रंगपंचमीनिमित्त चॅनेलने टेरेसवर सेलिब्रेशन ठेवले होते. या सेलिब्रेशनमध्ये चॅनेलशी संबंधित अनेक अभिनेते आणि अभिनेत्री सहभागी झाले होते. यात पीडित अभिनेत्रीही सहकलाकारांसह सहभागी झाली होती.
यावेळी आरोपीने भरपूर मद्यपान केले होते. दारूच्या नशेत त्याने अभिनेत्रीला जबरदस्तीने रंग लावला आणि तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने तिला धमकी दिली की, “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही.”
या घटनेमुळे धक्का बसलेल्या अभिनेत्रीने अंबोली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. अभिनेत्रीच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.