Crime News: अॅण्टॉप हिलमध्ये 147 ग्रॅम एमडीसह दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एमडी विकण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने अटक केली. ही कारवाई अॅण्टॉप हिल येथील जी.टी.बी. नगर परिसरात करण्यात आली.

गस्तीवर असताना पोलीस पथकाला दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आल्या. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 147 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून त्याची किंमत 44 लाख 10 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आतिफ शेख (22) आणि मन्सूर शेख (30) अशी आरोपींची नावे असून, दोघेही अॅण्टॉप हिल, मुंबई येथील रहिवासी आहेत.

गच्चीवरील इंटरनेटची मशीन व डिव्हाईसवर चोराचा डल्ला

घाटकोपरच्या गारोडिया नगरातील एका इमारतीच्या गच्चीवर ठेवलेली इंटरनेट मशीन व डिव्हाईस चोराने उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारोडिया नगरातील जय अभिषेक इमारतीत पंकजकुमार गुप्ता हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. पंकजचा इंटनरनेटचा व्यवसाय असून त्याकरिता त्याने इमारतीच्या गच्चीवर इंटरनेट मशीन व डिव्हाईस ठेवले होते. मात्र चोराने त्या दोन्ही वस्तू लंपास केल्याचा प्रकार घडला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पार्क केलेल्या दुचाकी चोरणारा सापडला

रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी शिताफीने चोरून नेणाऱया तरुणाला मुलुंड पोलिसांनी अटक केली. जॉय रायडिंगसाठी दुचाकी चोरणाऱया त्या तरुणाकडून पोलिसांनी तीन लाख 45 हजार रुपये किमतीचा सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याने एका तरुणाने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुलुंड पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपी हा रेकॉर्डवरचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी सराईत गुन्हेगार संदीप वंजारी (29) याला पकडले. त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात मुलुंड पोलिसांना यश मिळाले.

Comments are closed.