पुलवामा हल्ल्याची भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुलवामा हल्ल्यातील आरोपींना मदत केल्याचे भासवत अटकेची भीती दाखवून व्यावसायिकाला फसवणाऱ्या दोघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. अतुल गायकवाड आणि विनीत गायकवाड अशी त्या दोघांची नावे आहेत. त्याने बनावट नावाने बँकेत खाते उघडून सायबर ठगांना मदत केली होती.

तक्रारदार हे मालाड येथे राहतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवले. त्याच्याविरोधात कश्मीर येथे गुन्हा दाखल झाला आहे. पुलवामा हल्ल्यातील एका आरोपीकडे एक आधारकार्ड सापडले आहे. त्या आधारकार्डवरून विविध बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. त्या खात्यांत कोटय़वधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. एक कार्ड त्याच्या नावाने असल्याने गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्याचदरम्यान तक्रारदार यांना एकाने व्हिडीओ कॉल करून चौकशी केली. चौकशीदरम्यान ठगाने त्याच्या बँक खात्याचा तपशील जाणून घेतला.

ठगाने चौकशीच्या भुलथापा मारून त्यांना एका बँकेचा तपशील दिला. तक्रारदार याने त्याचे दागिने, बचत ठेवी मोडून ती रक्कम एका खात्यात ट्रान्सफर केली. चौकशीत मदत केल्यावर अटकेची कारवाई होणार नाही, जर मदत न केल्यास अटकेची कारवाई होईल अशी भीती दाखवली. अटकेच्या भीतीपोटी त्याने 26 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याची चौकशी बंद झाली.

Comments are closed.