अमरनाथ यात्रेबाबत बॉम्बची खोटी धमकी, मुंबईतील डिलिव्हरी बॉयला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमरनाथ यात्रेदरम्यान बॉम्बच्या धमकीचा खोटा संदेश कश्मीर पोलीस नियंत्रण कक्षाला पाठवल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समता नगर पोलिसांनी कांदिवली परिसरातील डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. शुभम सरजू यादव (26) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकीचा मेसेज पाठवण्यासाठी वापरलेला त्याचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 12 जुलै रोजी कश्मीर पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाला होता. या मेसेजमध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान बॉम्ब ठेवला जाईल असा दावा करण्यात आला होता. या धमकीची गांभीर्याने दखल घेत कश्मीर पोलीस निरीक्षक अब्दुल अहद यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस आणि त्यानंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क केले.

तांत्रिक विश्लेषणादरम्यान हा मेसेज कांदिवलीतील हनुमान नगर येथून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण समता नगर पोलिसांकडे सोपवण्यात आले. समता नगर पोलिसांनी पुढील कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीतून त्यानेच बॉम्बची धमकी देणारा संदेश पाठवल्याचे सिद्ध झाले. आरोपीने मजेत हा खोडसाळपणा केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.