… तर मुंबईत कृत्रिम पाऊस! पालिका प्रशासनाची तयारी; महासभेत सात तास चर्चा, सात धरणांमध्ये फक्त आठ टक्के पाणीसाठा उरला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जून संपत आला तरी पाऊस सुरू झाला नसल्याने पालिकेसमोर मुंबईत पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली झाली आहे. सातही धरणांमध्ये फक्त आठ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाऊस अजून लांबल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस किंवा इतर उपाय केले जातील, अशी माहिती आज पालिका महासभेत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. पालिका महासभेत आज लांबलेला पाऊस आणि तलावांतील घटलेला पाणीसाठा याबाबत तब्बल सात तास चर्चा झाली. यानंतर अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी पालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

जून महिन्यात जवळपास 400 मिमी पावसाची नोंद होते. मात्र जून महिना संपत आला असून पाऊस सुरू झालेला नाही. जुलै महिन्यात 2025 मध्ये कुलाबा येथे 374.6 तर सांताक्रूझ येथे 786.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात किती पाऊस बरसतो त्यावर पुढेचे नियोजन ठरेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मुंबईत लांबलेला पाऊस याविषयी सभागृह नेते गणेश खणकर यांनी मुद्दा उपस्थित करत पाणी पुरवठय़ाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे यशोधर फणसे, विशाखा राऊत, सचिन पडवळ यांच्यासह सर्वपक्षीय 30 हून अधिक नगरसेवकांनी लांबलेला पाऊस आणि संभाव्य पाणी संकट याबाबत आपले मत मांडले.

जलवाहिन्या बदलण्यासाठी आराखडा

मुंबईला सात धरणांतून दररोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात दररोज 5000 दशलक्ष लिटर उचलतो, परंतु पाणीगळती व चोरी यामुळे 1 हजार दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्यासाठी आराखडा तयार करत असून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे 1 ऑक्टोबरपासून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही बांगर म्हणाले.

टँकर माफिया पद्धत मोडीत काढणार

टँकर माफिया पद्धत मोडीत काढण्यासाठी ओटीपी बेसीसवर टँकर बुक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एखाद्या सोसायटीने टँकर बुक केला तर ओटीपी येईल आणि त्याची नोंद राहील. यामुळे पाणीचोरी थांबेल, असा विश्वास अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.

विहिरींवर मदार

विहिरींचे पुनर्भरण करण्यावर भर दिला असून पालिकेच्या 26 वार्डातील विहिरींची स्वच्छता करण्यात येत आहे. विहिरींची स्वच्छता झाल्यानंतर पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी ते पाणी उपलब्ध होईल, असे बांगर यांनी सांगितले.

अशी आहे सद्यस्थिती

  • पाणीपुरवठा करणाऱया सातही धरणांतील पाणीसाठय़ात घट होत असून सोमवारी फक्त 8 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात कधी व किती पाऊस बरसेल याची शाश्वती नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे काय नियोजन केले जाणार आहे.
  • उद्यानात पाणी, रस्ते धुणे आणि वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर यांसारख्या अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेचपारंपरिक तलाव आणि जलाशयांमधील गाळ काढून जलसाठा क्षमता वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

Comments are closed.