भक्तीचा महासागर लोटणार! लाडक्या गणरायाला आज निरोप, कडेकोट बंदोबस्त… 18 हजार पोलीस तैनात, 10 हजार कॅमेरे, ड्रोनचीही नजर
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. लालबाग, परळ, गिरगावातील अनेक मानाच्या गणपतींसह मुंबईतील हजारो सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे उद्या अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो गणेशभक्त सहभागी होणार असून जणू भक्तीचा महासागरच यावेळी लोटणार आहे. अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवून गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे सांगता करण्यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. 18 हजारांहून अधिक पोलीस ठिकठिकाणी तैनात असतील, तर दहा हजार कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. तसेच मुंबई पालिका प्रशासनाने बाप्पाच्या विसर्जनासाठी अगदी मंडपापासून ते चौपाटीपर्यंत चोख नियोजन आणि संपूर्ण व्यवस्था केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमधील शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत प्रचंड उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण असते. दक्षिण मुंबईतील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला लाखो गणेशभक्त गर्दी करतात. त्यांच्या दिमतीला पालिकेची संपूर्ण यंत्रणा, पोलीस दल, रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिकेने विविध सोईसुविधा उपलब्ध केल्या आहेत. शहर व उपनगरांतील 70 नैसर्गिक स्थळे आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आहेत. गणेशभक्तांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना ‘इन अॅक्शन’ केल्या असून शहरभर ठिकठिकाणी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. ड्रोनच्या माध्यमातून गर्दी व चौपाट्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर बदल केले आहेत. मिरवणूक मार्गांवर पार्किंगला मनाई असेल. बरेच मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून काही मार्गांवर एकेरी वाहतुकीला मुभा असेल. गर्दीचा आढावा घेऊन पुढची व्यवस्था करण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाणार आहे.
कोस्टल मार्ग 24 तास खुला
वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याकरिता कोस्टल मार्ग 24 तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कुठूनही कुठेही ये-जा करता येणार आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुका किंवा चौपाटय़ांवर येणाऱया नागरिकांनी खासगी वाहने न आणता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यावर बंदी
मिरवणुकांचे चित्रीकरण करण्यासाठी काही हौशी तरुण ड्रोनचा वापर करतात. मात्र त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबई शहरात परवानगीशिवाय ड्रोन उडविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे परवानगी नसेल तर हौशी गणेशभक्तांना ड्रोन उडविण्याच्या मोहाला आवर घालावा लागेल, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
दहा हजार सीसीटीव्ही, ‘एआय’द्वारे करडी नजर
गणेशभक्तांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस जागता पहारा ठेवणार आहेत. त्यादृष्टीने शहरात दहा हजार सीसीटीव्ही पॅमेरे बसवले आहेत. त्या पॅमेऱयांतून भक्तांच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. ड्रोन आणि एआयच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
मोठ्या गणपतींच्या वाहनांना ’क्युआरकोड’
शहरातील मोठय़ा गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिस आणखी आधुनिक यंत्रणेचा वापर करणार आहेत. मोठ्या बाप्पांच्या मिरवणुकीत वाहनांना क्युआरकोड लावण्यात येणार आहे. मग एआयच्या सहाय्याने त्या क्युआरकोडद्वारे मिरवणुक कुठे आहे, गर्दी किती आहे, वाहतुकीचा खोळंबा वगैरे होतोय का? या सर्व बाबींवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे पोलिस पुढची रणनिती ठरवणार आहेत.
असा असेल बंदोबस्त
- शहर पोलीस-14 अपर आयुक्त, 40 उपायुक्त, 61 एसीपी, तीन हजार निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 18 हजार कर्मचारी असा फौजफाटा असेल. सोबतीला एसआरपीएफच्या 14 कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाचे तीन प्लाटून, बीडीडीएस, क्यूआरटी, सीसीटीव्ही व्हॅन, मसुब जवान असतील.
- विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवर गणवेशधारी तसेच साध्या वेशातील पोलीस
- छेडछाड, विनयभंग आदी गुन्हे तसेच चोरीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी.
- दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी आधुनिक तांत्रिक यंत्रणादेखील इन अॅक्शन मोडवर.
- बॉम्बशोधक व नाशक पथके, श्वान पथके सातत्याने प्रत्येक ठिकाणी पाहणी करणार.
- जागोजागी बॅरेकेटिंग आणि नाकाबंदी.
- 538 जीवरक्षक, तटरक्षक दलाचे जवान व कोळी बांधव तैनात ठेवण्यात येणार आहेत.
मध्य-पश्चिम रेल्वेवर रात्री विशेष लोकल
अनंत चतुर्दशीच्या रात्री पश्चिम रेल्वेवर 1.15 ते 3.45 आणि मध्य रेल्वेवर 1.40 ते 3.25 या दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यान सहा अतिरिक्त लोकल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सहा विशेष लोकल धावणार आहेत.
या 12 उड्डाणपुलांवर सावधान
शहरातील 12 रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आहेत. त्यावर गर्दी आणि वाहनांचा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच संबंधित उड्डाणपुलांचा वापर करता येईल. त्यात घाटकोपर, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, मरीन लाईन्स, ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडमधील सॅडहर्स्ट रोड, फ्रेन्च, केनेडी, फॉकलन्ड, महालक्ष्मी स्टिल, प्रभादेवी-पॅरोल, दादर- टिळक या रेल्वे उड्डाणपुलांचा समावेश आहे.
‘राफेल’मधून पुष्पवृष्टी!
लालबाग येथील श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने यंदा पुष्पवृष्टीसाठी राफेल विमानाची भव्य प्रतिकृती साकारली असून पुष्पवृष्टीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुंबईत विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात
आला असून शुक्रवारी ठिकठिकाणी पोलिसांनी रुट मार्च काढला. त्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सहभागी झाले होते.
Comments are closed.