अंधेरीच्या मरोळमध्ये ऑक्सिजन वाढला, साडेतीन एकरात फुलले नागरी वन; मुंबईच्या तापमानात होणार चार अंशांची घट

मुंबईत होणाऱ्या इमारतींच्या बांधकामांमुळे आणि वाहनांमुळे वाढलेल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर मुंबईत देशी-परदेशी झाडांनी अधिकाधिक नागरी वने विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून पालिकेने मरोळमध्ये साडेतीन एकरात नागरी वन फुलवले आहे. त्यामुळे मुंबईतील झाडांची संख्या वाढली असून ऑक्सिजनमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान, नागरी वनाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत मुंबईच्या तापमानात किमान तीन ते चार अंश डिग्री सेल्सिअसची घट होणार आहे.
पालिका आणि मरोळ इंडस्ट्रियल इस्टेटच्या सहकार्याने साडेतीन एकरमध्ये महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी उद्यान हे नागरी वन नागरी वन विकसित केले आहे. माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण झाले. मरोळ इंडस्ट्रियल इस्टेट, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूट यासारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून या उद्यानातील विविध नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन निधीतून या उद्यानाचा विकास करण्यात आला असून मुलांना खेळण्याच्या सुविधा, मनोरंजनासाठजागा, स्वच्छतागृह, प्रदर्शनासाठी जागा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बांबू, बकुळ, आंब्यासह विविध प्रजातींची झाडे
संपूर्ण प्रकल्प अंतर्गत देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. बांबू, बकुळ, आंबा अशा विविध प्रजातीच्या 10 हजार झाडांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीमुळे वर्षभरात या परिसरातील तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होईल, असे एका अभ्यासगटाच्या अहवालात आढळले आहे.
- परिसरातील मलनिस्सारण प्रकल्पातून नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी करण्यात येत आहे.
- मुंबईतील हा पहिला पर्यावरणपूरक मलनिस्सारण प्रकल्प आहे.
- अवघ्या एका वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले.
Comments are closed.