Mumbai – Goa Highway आज चाकरमानी ठोकणार बोंब, रखडलेल्या महामार्गाविरोधात माणगावमध्ये सरकारच्या नावाने शिमगा

मुंबई-गोआ-हायवे-प्रोटेस्ट-अथॉरिटी

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम १४ वर्षांपासून रखडले असून महामार्गाच्या कामासाठी दरवर्षी सरकार नवनवीन डेडलाइन देत आहे. खोके सरकारच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी उद्या माणगावमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. सांगा कधी महामार्ग पूर्ण करणार की फक्त आश्वासनच देणार, असा जाब विचारत जनआक्रोश समिती आणि शेकडो रायगडकर सरकारच्या नावाने बोंब ठोकणार आहेत.

२०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र महामार्गावरील ठिकठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पूल, मोऱ्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर मागील १४ वर्षांत ५ हजार ६१ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार २२९ जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनतेत रोष असून उद्या १३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून महामार्गावरील माणगाव बस स्थानक येथे ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.

शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा

होळी व गणेशोत्सवासाठी गावी जाणारे चाकरमानी दरवर्षी वाहतूककोंडीत अडकतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बस स्थानक येथे सायंकाळी ५ वाजता ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी दिली.

Comments are closed.