पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रीटला भेगा, कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. संगमेश्वर येथील शास्त्राr पुलाजवळ, दानीश चायनीज सेंटरसमोरील नवीन काँक्रीट रस्ता खचल्याने आणि मोठय़ा प्रमाणात भेगा पडल्याने महामार्गाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता सरळ सरळ दोन भागांत विभागला गेला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे आधीच संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे समोर आले आहे. रस्ता धोकादायक असल्याची माहिती असूनही ठेकेदार पंपनीने कोणतेही बॅरिकेड्स वा सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अवजड वाहनेही बेधडकपणे धोकादायक प्रवास करत आहेत. बांधकाम विभागाने तत्काळ या मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने अधिकारी वर्गाला जाब विचारू असा इशारा शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी दिला.

गोळवलीत भूस्खलन!

मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील गोळवली परिसरात भूस्खलन होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. डोंगराचा मोठा भाग खचल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूस्खलनामुळे गोळवली वाडय़ाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पावसामुळे सुपारी बागा जमीनदोस्त झाली आहे.

कुचांबेत दरड कोसळली

रत्नागिरी जिह्यात मुसळधार पावसामुळे दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढले आहे. कुचांबे काsंडभैरव येथे घरांवर दरड कोसळल्याने 3 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शेनवडी येथील सरपंच दत्ताराम लाखन यांच्यासह आसपासच्या घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे.

माखजन-करजुवे मार्गावर दरडी

संगमेश्वर तालुक्यातील माखजन-करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली असून हा मार्ग अतिशय धोकादायक झाला असून या मार्गावरून जाताना कसरत करावी लागली. धामापूर, वेसवी वाडी, धनावडे वाडी आदी ठिकाणी बाजूच्या डोंगराचा भाग रस्त्यावर आल्याने एसटीसह खासगी वाहनांना यातून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे.

Comments are closed.