समृद्धी महामार्गावर मुंबईच्या सराफाला लुटलं; चालकच दरोडेखोरांचा ‘सारथी’ बनला अन् 4.60 कोटींचं सोनं लंपास केलं

समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी पोळ्याच्या सणाच्या दिवशी सायंकाळी मुंबईच्या सोने व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याच्या गाडीचा चालकच दरोडेखोरांचा सारथी बनला आणि दरोडेखोरांसोबत मिळून त्याने 4 कोटी 66 लाख रुपयांचे सोने लंपास केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई येथील अनिल शेषमल चौधरी (वय – 55, रा. सिवूड रेसिडेन्सी, नेरूळ नवी मुंबई) यांचा मुंबई येथे सोन्याच्या होलसेल व्यापाराचा व्यवसाय असून त्यांचा ‘मंगळसूत्रम’ नावाने प्रतिष्ठान सुद्धा आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खामगाव येथील कामकाज आटोपून ते किआ गाडीने (क्रम. एमएच 43 बीयू 9557) मेहकर जवळील समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. फरदापूरजवळील टोलनाका पार केल्यानंतर चालक गमेर सिंग याने अनिल चौधरी यांना तुम्ही गाडी चालवा असे म्हटले आणि गाडी बाजुला उभी केली. गाडी थांबवताच पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनातून (क्र. आरजे 27 टीए 9742) तिघे दरोडेखोर उतरले.
दरोडेखोरांनी चौधरी यांच्या चाकूने हल्ला केला आणि डोळ्यात मिरची पूड फेकली. या दरम्यान सोने व्यापारी चौधरी यांच्या गाडीतील 22 कॅरेटचे पाच किलो सोने असलेली बॅग उचलून दरोडेखोर मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दरोडेखोरांनी वाहन एवढ्या भरधाव वेगाने पळवले की, मालेगाव टोल नाक्यावर वाहन थांबवण्यासाठी असलेला आडवा दांडा तोडून हे ते मेडशी-पातुर रस्त्याने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. मालेगाव टोलनाका ओलांडल्यानंतर दरोडेखोरांची गाडी पातूरच्या दिशेने गेली आहे. पातूरच्या जंगल परिसरात त्यांनी गाडी सोडून पलायन केल्याची माहिती मिळत आहे. मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक वेंकटेश्वर आलेवार, मेहकरचे पोलीस कर्मचारी पथक, वाशिम पोलीस, अकोला पोलीस, अमरावती पोलीस मेडशी पातूरच्या जंगलात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अनिल चौधरी यांच्या तोंडी फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी शनिवारी पहाटे साडेचार वाजता भादवी कलम 309 (6).3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे हे करत असून दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत व्यापारी अनिल चौधरी यांच्या उजव्या हाताला चाकूचा मार लागला आहे. शुक्रवारी रात्रीच त्यांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची माहिती मिळते.
Comments are closed.