रिफ्युजी एरियाला सोसायटीचे सदस्यत्व मिळणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, निबंधकांचे आदेश रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रिफ्युजी एरियाची नोंद असलेल्या घरांना गृहनिर्माण सोसायटीचे सदस्यत्व मिळणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

भांडूप येथील एका इमारतीतील रिफ्युजी एरियाचे घर विकत घेतलेल्याला सोसायटीचा सदस्य करून घेण्याचे आदेश विभागीय निबंधकांनी दिले होते. याविरोधात या सोसायटीने याचिका दाखल केली होती. न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित इमारतीतील रिफ्युजी एरियाचे घर राहण्यास योग्य नाही, असे ओसीमध्ये स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे या घरासाठी सोसायटीचे सदस्यत्व मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका मंजूर केली. तसेच विभागीय आयुक्तांचे आदेशही न्यायालयाने रद्द केले.

विकासकाने विकले फ्लॅट

रिफ्युजी एरियाचे फ्लॅट विकासकाने विकले. मुळात या फ्लॅटची रिफ्युजी एरिया म्हणून नोंद आहे. या फ्लॅटची मालकी सोसायटीकडे आहे. असे असताना विकासक याची विक्री करू शकत नाही, असा दावा सोसायटीने केला. सहाय्यक निबंधकांनी रिफ्युजी फ्लॅटच्या सदस्य नोंदणीला नकार दिला होता. मात्र विभागीय निबंधकांनी हा निकाल फिरवला.

घरालाच सदस्यत्व मिळणार

इमारतीत असलेल्या घरांनाच सोसायटीचे सदस्य होता येते. भूखंड मालकाने अतिरिक्त घरे बांधल्यास त्यांनाही सोसायटीचे सदस्यत्व मिळू शकते. मात्र घर अशी नोंद नसेल तर सोसायटी सदस्य होताच येत नाही. याप्रकरणात ही घरे रिफ्युजी एरिया आहेत. त्यांना सदस्यत्व दिल्यास ते नियमाच्या विरुद्ध ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सदस्यत्व मिळायला हवे

विकासकाला रिफ्युजी एरियाची घरे विकण्याचा अधिकार नाही या आधारावर सोसायटीचे सदस्यत्व नाकारता येणार नाही. मुळात ही घरे रिफ्युजी एरियाची नाहीत, असा युक्तिवाद ही घरे विकत घेणाऱयांकडून करण्यात आला. तो न्यायालयाने अमान्य केला.

Comments are closed.